‘ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा
शासन दरबारी पाठपुरावा सुरू’
‘ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू’

‘ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू’

sakal_logo
By

मंचर, ता. १० : ‘राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय विमा लागू करावा, सर्व बँकांमधून कर्ज कमी व्याजदराने मिळावे, रेल्वेत मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, आदी प्रलंबित प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. याकामी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही सहकार्य आहे,’ अशी माहिती राज्याचे फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली.


मंचर (ता. आंबेगाव) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात रोडे बोलत होते. उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांचा व तालुक्यातील २६ ज्येष्ठ संघांना माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, पुणे फेस्कॉमचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी, पुणे प्रादेशिक विभाग फेस्कॉम सचिव हनुमंत कुंभार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये कमलजादेवी (कळंब), संत ज्ञानेश्वर (चास), श्रीराम (नांदूर), मुक्तादेवी (नारोडी), भैरवनाथ (अवसरी बुद्रुक), मंचर, पेठ, घोडेगाव, निरगुडसर आदी ज्येष्ठ नागरिक संघाचा समावेश आहे.

आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ भालेराव यांनी सांगितले की, आंबेगाव तालुक्यात १०४ गावांपैकी ५० गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे. उर्वरित गावातही संघ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यात दोन हजार २५० ज्येष्ठ नागरिकांची नावनोंदणी पूर्ण झाली आहे. आजारी पडल्यानंतर वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध व्हावी, म्हणून आवश्यक ते प्रयत्न केले जातात. विरंगुळा म्हणून सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग दर्शन घडवून आणण्याचे नियोजन सुरू आहे.

यावेळी बाळासाहेब बाणखेले, काशिनाथ वळसे पाटील, ॲड. बाळासाहेब बाणखेले, अशोक वळसे पाटील आदी उपस्थित होते. ए. एफ. इनामदार यांनी सूत्रसंचालन केले, तर सोपानराव नवले यांनी आभार मानले.
-------------------
ज्येष्ठ नागरिकांनी तणावमुक्त जीवन जगावे, आरोग्याची काळजी घ्यावी, गावातील विविध धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना विरंगुळा म्हणून सहभागी व्हावे. - देवदत्त निकम, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती
-------------------...........