आंबेगावात २१ ग्रामपंचायतींसाठी रंगतदार लढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात २१ ग्रामपंचायतींसाठी रंगतदार लढती
आंबेगावात २१ ग्रामपंचायतींसाठी रंगतदार लढती

आंबेगावात २१ ग्रामपंचायतींसाठी रंगतदार लढती

sakal_logo
By

मंचर, ता. १७ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम म्हणूनच आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना व भाजप, अशी लढत रंगतदार होणार आहे. ठाकरे गटही निवडणुकीत उतरणार आहे.

पारगावतर्फे खेड येथे राष्ट्रवादीतच चुरस
पारगावतर्फे खेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन गटात लढत होण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून सचिन हे पानसरे होते. यावेळी येथे लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. येथे ११ सदस्य व लोकनियुक्त सरपंचपदासाठी नंदा सचिन पानसरे व सुरेखा भाऊसाहेब सावंत पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाऊसाहेब सावंत पाटील हे शिवसेनेचे या भागातील मात्तबर नेते म्हणून ओळखले जातात. पण, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी अलिप्त राहणे पसंत केले. त्यांची राष्ट्रवादीबरोबर जवळीक वाढलेली आहे. त्यांचे बंधू रमेशराव सावंत पाटील हे राष्ट्रवादीचे आंबेगाव तालुका उद्योग विभागाचे अध्यक्ष आहेत. सचिन पानसरे यांनी येथील राष्ट्रवादीचा गड टिकवून ठेवण्याचे काम केले. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री वळसे पाटील व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे याबाबत काय निर्णय घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. दोन उमेदवारांत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, अशी गावात चर्चा सुरु आहे.

निघोटवाडीचे सरपंचपद खुले
निघोटवाडी ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच म्हणून नवनाथ निघोट यांनी कामकाज पहिले आहे. ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथील सरपंचपद खुले आहे. येथे लोकनियुक्त सरपंच व १३ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. पुन्हा लोकनियुक्त सरपंचपदासाठी नवनाथ निघोट, ठाकरे गटाकडून सचिन जयप्रकाश निघोट यांचे नाव चर्चेत आहेत. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही गट कार्यरत आहेत.

भावडीत सात सदस्य
भावडी येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून महेश नवले (बाळासाहेबांची शिवसेना) यांनी कामकाज पहिले आहे. येथे लोकनियुक्त सरपंच व सात सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून अजून उमेदवाराचे नाव निश्चित केले नाही, असे महेश नवले यांनी सांगितले. येथे अशोक बाजारे (बाळासाहेबांची शिवसेना) यांना मानणारा वर्ग मोठा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कल्पना तेली यांचे नाव चर्चेत आहे.

निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज भरणे- २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
- छाननी- ५ डिसेंबर
- माघार व चिन्ह वाटप- ७ डिसेंबर
- मतदान- १८ डिसेंबर
- निकाल- २० डिसेंबर

आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकत्रितपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात लढविणार आहे. त्या दृष्टीने शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व तालुका भाजपचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरु आहे.
- जयसिंग एरंडे, जिल्हा संपर्कप्रमुख, भाजप

लोकनियुक्त सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने निवडून येण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.
- विष्णू हिंगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

लवकरच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन स्वतंत्र किंवा महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवायची याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
- सुरेश भोर, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष