अवसरीत विद्यार्थ्यावर कटरने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीत विद्यार्थ्यावर कटरने हल्ला
अवसरीत विद्यार्थ्यावर कटरने हल्ला

अवसरीत विद्यार्थ्यावर कटरने हल्ला

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील राहुल गौतम आवारी (वय १९, तिसरे वर्ष अभियांत्रिकी, रा. देवतुरणे, ता. खेड) या विद्यार्थ्यावर याच वर्गातील प्रतीक मुकुंद भोर (वय १८, रा. भोरवाडी, ता. आंबेगाव) याने शुक्रवार (ता. १८) दुपारी कटरने हल्ला केला. उजव्या हातावर मानेवर व होटावर मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ला करणारा भोर हा विद्यार्थी फरारी झाला आहे. त्याचा शोध मंचर पोलीस घेत आहेत. शुक्रवारी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम सुरु होता. या विद्यार्थ्यांचे स्वागत दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात शिकणारे अभियांत्रिकी विद्यार्थी करत होते. कार्यक्रम झाल्यानंतर आवारी हा मोबाईलवर बोलत चालला होता. त्यावेळी अचानकपणे पाठीमागून आलेल्या भोर याने त्याच्यावर धारदार कटरने हातावर, गालावर, मानेवर वार केले.
अनाहूतपणे घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले. काही जणांनी प्रसंगावधान राखून आवारी याला ताबोडतोब मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. विद्या खेडकर व डॉ. विनायक खेडकर यांनी त्याची तपासणी केली. त्याला मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. रक्तप्रवाह सुरु होता. त्याला १५ टाके पडले. ‘प्रकृतीचा धोका टाळला आहे,’ असे डॉ. विनायक खेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस हवालदार राजेंद्र हिले, एस. बी. घोडे, अजित पवार यांनी रुग्णालयामध्ये जावून घडलेल्या प्रकारची माहिती आवारी याच्याकडून घेतली. यासंदर्भात त्याचा जबाब नोंदवला आहे.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षणासाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. पण स्थानिक गुंड प्रवृत्तीचे काहीजण स्थानिक विद्यार्थ्यांना हाताशी धरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारचा त्रास अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. प्राध्यापक व प्राचार्य यांनी मंचर पोलिसांच्या मदतीने गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना धडा शिकवण्याचे काम करून महाविद्यालय परिसरात शातंता निर्माण करावी.
- गौतम आवरी, जखमी राहुल याचे वडील

अत्यंत किरकोळ कारणावरून आवारी ह्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला. आरोपी भोर हा फोटो काढत होता. त्यावेळी आवारी त्याला म्हणाला, ‘वेडेवाकडे चाळे करून फोटो काढू नकोस.’ मात्र, आपला अपमान झाला, या भावनेतून चिडून जाऊन कार्यक्रम संपल्यानंतर भोर याने कटरच्या साह्याने पाय, हात व गालावर तीन-चार वार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याबाबत न घाबरता मंचर पोलिसांना माहिती दिल्यास नाव गुप्त ठेवले जाईल.
- सतीश होडगर, पोलिस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे