सत्तर गावातील अतिक्रमणधारकांना नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तर गावातील अतिक्रमणधारकांना नोटिसा
सत्तर गावातील अतिक्रमणधारकांना नोटिसा

सत्तर गावातील अतिक्रमणधारकांना नोटिसा

sakal_logo
By

मंचर, ता. २८ : आंबेगाव तालुक्यात ७० गावातील गायरान क्षेत्रातील तीन हजार २६७ अतिक्रमण हटविण्याच्या प्रशासकीय कारवाईला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेग आला आहे. देवगाव हे गावच अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे लागेल, अशी परिस्थिती आहे. नोटिसा आल्याने अतिक्रमण धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अतिक्रमण धारकांच्या विरोधात कारवाई झाल्यास गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर येतील. गरीब कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घ्यावा,” अशी मागणी इंदिरानगर, निघोटवाडी येथील कुटुंबांनी वळसे पाटील यांना भेटून केली. येथील २७२ कुटुंबांना अतिक्रमण पाडून टाकण्याबाबत प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. येथे बीड, मराठवाडा भागातून स्थलांतरित झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांची घरे आहेत.
“गायरान जागेतील अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत अतिक्रमण काढण्यासाठी आदेश दिले आहेत. या संदर्भात तातडीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे दिलीप वळसे पाटील यांनी संपर्क साधून चर्चा केली. “राज्य शासन नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार योग्य तो निर्णय घेईल,” अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. यावेळी अतिक्रमण धारकांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, राष्ट्रवादीचे मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले, प्रमोद बाणखेले, राजू जाधव उपस्थित होते.

“हातावर पोट असणाऱ्या अनेक गरिबांची घरे गायरान जमिनीत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईत त्यांची घरे पाडून टाकल्यास त्यांचे संसार उघड्यावर पडतील. सध्या चिंतेत असलेल्या अतिक्रमण धारकांनी घाबरू नये. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
-दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.

“ज्या पद्धतीने शहरात गुंठेवारी किंवा अनधिकृत बांधकामांना अधिकृत करून दिले जाते. तसेच या गरीब लोकांना गायरानमधील अतिक्रमण नियमित करून द्यावीत.”
-विवेक वळसे पाटील, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद.

आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक अतिक्रमण धारक नोटिसा अवसरी बुद्रुक गावात ३५९ जणांना आहेत. अन्य प्रमुख गावांची नावे व नोटीस धारकांची संख्या :- निघोटवाडी- इंदिरानगर २७२, देवगाव २३०, चांडोली खुर्द १८३, अवसरी खुर्द १७१, निरगुडसर १६९, धामणी १०३ , सुलतानपूर ३७, पेठ १९६.