
मंचर येथे महिलेचे मंगळसूत्र लांबविले
मंचर, ता. २३ : येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर घराकडे निघालेल्या ज्येष्ठ महिलेला चोरट्यांची भीती दाखवून त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र हातचलाखीने लांबविले.
याबाबत सिंधूबाई बबन थोरात (वय ६६, रा. मंचर) या महिलेने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या देवदर्शन करून घरी निघाल्या होत्या. दोन व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्याजवळ येऊन थांबल्या. पाठीमागे बसलेल्या व्यक्ती त्यांना म्हणाली, ‘‘मावशी, येथे एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार झाले आहेत, तुम्ही एवढे दागिने घालून फिरू नका, तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यावेळी थोरात म्हणाल्या, ‘मी येथेच राहत आहे.’ त्यावेळी सदर व्यक्ती म्हणाल्या, ‘तुमच्या गळ्यातील दागिने काढून द्या. ते पिशवीत ठेवतो.’ भीतीपोटी थोरात यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांच्याकडे दिले. त्या दोघांनी कागदाच्या पुडीत मंगळसूत्र बांधून पिशवीत ठेवल्यासारखे भासवले. तसेच, ‘पुडी इथे उघडू नका’ असेही सांगितले. त्यानंतर ते मोटारसायकलवरून निघून गेले.
दरम्यान, थोरात घरी आल्यानंतर कागदाची पुडी उघडून पाहिली. मात्र, पुडीत मंगळसूत्र नसून, माती होती. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. याबाबत मंचर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. बी. हगवणे हे तपास करत आहेत.