मंचर गावाची शहराकडे दमदारपणे वाटचाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर गावाची शहराकडे
दमदारपणे वाटचाल...
मंचर गावाची शहराकडे दमदारपणे वाटचाल...

मंचर गावाची शहराकडे दमदारपणे वाटचाल...

sakal_logo
By

मंचर गावाची शहराकडे
दमदारपणे वाटचाल...

बदलत्या काळानुसार मंचर गावाचे शहर झाले आहे. गावची रचना तशी पारंपरिक होती. गावाच्या मधोमध बाजारपेठ होती. गावठी व इलायती कौलारू घर नामशेष झाली असून, टोलेजंग इमारती व बंगले उभे राहिले आहेत. सोन्या-चांदीची, कपड्यांची, किराणा मालाची व शेतीमालाची मोठी बाजारपेठ झाली आहे.

- डी. के. वळसे पाटील, मंचर

आंबेगाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून मंचर गावाची ओळख आहे. तालुक्यातील अन्य गावांतील अनेक कुटुंब मंचरला स्थिरावली आहेत. पंचक्रोशीतील, राज्यातील व परराज्यातील अनेकांना येथे पराग मिल्क फूड्स व मोरडे फूड्सच्या माध्यमातून येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामपंचायतीचे मंचर नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. नगरपंचायतीने स्वच्छ व सुंदर शहर होण्यासाठी दमदारपणे वाटचाल सुरु केली आहे.

परिवर्तनाच्या अनेक लाटा
पूर्वी निघोटवाडी व शेवाळवाडी या दोन्ही गावाचा समावेश मंचरमधेच होता. गावात राहणारे शेतकरी थोरात, बेंडे, बाणखेले, घुले, बागल, मोरडे, निघोट, गुंजाळ, खानदेशे, माशेरे, त्यांच्या शेतावर वस्ती करून राहत होते. पुढे या वस्त्यांचे वाडीत, मळ्यात रूपांतर झाले. तर, गावात जैन, ब्राह्मण, मराठा, मुस्लीम, तेली, तांबोळी, कोल्हाटी, बारा बलुतेदारांसह अठरा पगड जाती एकोप्याने राहायच्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून घोडेगाव रस्त्याला जाताना हाकेच्या अंतरावर सुलतान मंजिल यांचा इंग्रजांच्या काळातील सुरेख वाडा आजही उभा आहे.
पूर्वी रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारपेठ गजबजून जात होती. आंबेगाव तालुक्याप्रमाणेच खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील लहान मोठे व्यापारी बाजारात हजेरी लावत होते. गुरांचा बाजारही प्रसिद्ध होता. पोस्ट कार्यालयामागे शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरत होता. पायी, सायकल किंवा बैलगाडी व घोड्यावरूनच अनेकजण बाजाराला येत होते. चारचाकी वाहनांची संख्या फारच कमी होती. नवीन मोटारसायकल आली तर पाहण्यासाठी गर्दी होत होती. मंचर ग्रामपंचायतीजवळच एसटी बसस्थानक होते. ग्रामपंचायत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मुंजाबा मंदिर बेंडे मळा ते महात्मा गांधी विद्यालय असा एसटी गाड्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग होता. मंचरमध्ये परिवर्तनाच्या अनेक लाटा येऊन गेल्या. पूर्वीचे आणि आताचे मंचर यात फारच बदल झाला आहे. कौलारू घरे दिसेनाशी झाली असून, टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गावाचा चेहरामोहराच शहराच्या वाटचालीने बदलला आहे. प्रशस्त बसस्थानक झाले असून बाह्यवळण रस्ता वाहतुकीस खुला झाला आहे.

पाण्याचा प्रश्‍न सुटला
एकेकाळी मंचर गावाची ओळख दुष्काळी म्हणून होती. पाहुण्याला प्यायला पाणी देणे कठीण होऊन जायचे. हॉटेलमध्ये तर, ‘नाश्ता केला तरच पाणी मिळेल’ असे फलक पहावयास मिळत होते. आठवडे बाजारात पाच पैसे दिल्यानंतर ग्लासभर पाणी पिण्यासाठी मिळत होते. लग्न जमविताना मुली देताना पालक कानकूस करत होते. पाण्यामुळे गावाचा विकास थांबला होता. नंतर हुतात्मा बाबू गेनू जलाशयामुळे (डिंभे धरण) पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
एकेकाळी माजी खासदार लोकनेते (स्व.) किसनराव बाणखेले, रामशेठ बाबूराव थोरात, विठ्ठलराव चिखले, विठ्ठलराव बाणखेले, बुबा बाबाजी थोरात, एकनाथशेठ मोरडे, कुमारपाल समदडीया, प्रकाशशेठ शहा, एम. टी. थोरात, हिदायत अली इनामदार, निवृत्ती शेटे गुरुजी, सीताराम बेंडे, बाळासाहेब पंधारे, नानाभाऊ बाणखेले, सबाजी थोरात, कामगार नेते ॲड बाळासाहेब बाणखेले, सीताराम थोरात, अॅड. वसंतराव गुंजाळ हे त्यावेळी गाव कारभारी होते. भांडण-तंटे गावातच सोडवले जात होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ पोलिस चौकी होती.

उद्योगामुळे रोजगार संधी
मंचरमध्ये उद्योग धंद्यामुळे व्यापाराची उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर आहे. पूर्वी हातमागाचा धंदा मोठ्या प्रमाणात होता. त्याची जागा बारदानाच्या धंद्याने घेतली आहे. त्यामुळे कामधंदा मिळाला
आहे. मंचरचे सुपुत्र देवेंद्र शहा यांनी ‘पराग मिल्क फूड्स’ने विकसित केलेल्या ‘गोवर्धन’ ब्रँडची कीर्ती सात समुद्रापार गेली आहे. तसेच, (स्व.) एकनाथ मारुती मोरडे, चंद्रकांत मोरडे यांनी ‘मोरडे फूड चॉकलेट’ कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हर्शल मोरडे यांनी १५०हून अधिक विविध प्रकारची उत्पादने घेतली आहेत. दोन्ही प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाच हजार कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पराग व मोरडे या उद्योग समूहामुळे मंचरचे नाव जगाच्या नकाशावर गेले आहे. अवसरी दुध शीतकरण केंद्राचेही योगदान आहे.

हिंदू-मुस्लीम ऐक्य
मारुती मंदिर, जैन मंदिर, शाही मशिदी या शेजारी असून, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आजही घडवितात. गावात हिंदू-मुस्लिमांची संख्या बरीच मोठी आहे; परंतु तरीही गावात कधीही कलह झाला नाही. गणेश उत्सवात मुस्लिमांचा; तर ईद व मोहरम सणात हिंदूंचा सक्रिय सहभाग असतो. येथील सर्व समाज आजही गुण्यागोविंदाने राहत आहे.

आरोग्य सुविधा
गावात पूर्वी डॉक्टरांचा तुटवडा होता. आजारी माणसाला दवाखान्यापर्यंत पाठीवर टाकून किंवा बैल गाडीतूनच न्यावे लागत होते. सरकारी आरोग्य केंद्रही नव्हते. बापूलाला अंबालाल धर्मार्थ दवाखाना होता. एकमेव पारेख मेडिकल व गुरव नाना यांचे भारत औषधी वनस्पती आयुर्वेदिक दुकान होते. डॉ. आढाव, डॉ. तोडकर, डॉ. मोहन साळी, डॉ. सुदाम खिलारी, डॉ. राम कटारिया, डॉ. चव्हाण, डॉ. गुजराथी, डॉ. चंद्रकांत पोखरकर, डॉ. लांबा यांचे बोटावर मोजण्याइतकेच दवाखाने होते. दादा न्हावी यांचे आयुर्वेदिक उपचार केंद्र फार प्रसिद्ध होतं. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तेथे रुग्णांची वर्दळ असायची. विशेषतः भाजलेल्या रुग्णांना त्यांचा मलम रामबाण उपाय म्हणून ओळखला जात होता. माजी खासदार लोकनेते (स्व.) किसनराव बाणखेले, सहकार महर्षी माजी आमदार (स्व) दत्तात्रेय वळसे पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही दादा नाव्ही यांच्याकडे उपचार घेतले आहेत. डॉ. पायामोडे यांची रक्त तपासणी प्रयोग शाळा होती. आता गल्ली गल्लीत डॉक्टर व मेडिकल स्टोअर, रक्त तपासणी प्रयोगशाळा झाल्या आहेत. येथे गेटवेल, डॉ. लोहकरे, संजीवनी, विघ्नहर्ता, डॉ. गाडे, प्रांजल, डॉ. मांढरे, हरिरूप डेन्टल केअर, डॉ. दादाभाऊ पोखरकर, डॉ. ओंकार काजळे यांच्या दवाखान्यात पुणे-मुंबई प्रमाणे अद्ययावत सुविधा मिळतात.

साहित्यिकांचे गाव
कवयित्री शांता शेळके, निसर्ग कवी ग. ह. पाटील, कवी शंका थोरात, साहित्यिक भीमसेन देठे यांचे मंचर हे गाव आहे. गावची भैरवनाथाची जत्रा म्हणजे पर्वणीच! विठाबाई नारायणगावकर, आनंदा चांडोलीकर, कुशाबा अवसरीकर हे तमासगीर मंचरच्या अंगाखांद्यावर मोठे झाले. मंचरची कुस्ती परंपरा आजही आहे. गुलाबभाई पहिलवान, ठकसेन बाणखेले, मानाजी पैलवान हे आदर्श तरुणांसमोर आहेत. गावात सांस्कृतिक बदल होत आहेत. तमाशाची जागा आता व्याख्यानमालेने घेतली आहे. माजी खासदार (स्व.) किसनराव बाणखेले व कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले यांनी व्याख्यानमाला सुरू केली आहे. साहित्य परिषद व शांता शेळके प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे. नव्याने अनेक साहित्यिक या गावाने दिले आहेत.

शिक्षणाचे केंद्र
पूर्वी मंचरला हायस्कूल देखील नव्हते. बाबासाहेब पाटील यांनी शैक्षणिक कार्य मोठे केले. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाची भव्य इमारत उभी आहे. प्राचार्य (स्व.) अप्पासाहेब पानवळ यांचे मोठे योगदान आहे. चावडी चौकात मुलीची शाळा भरत होती. दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, किसनराव बाणखेले, शिवाजीराव बेंडे पाटील यांच्यामुळे शिक्षणाला चालना मिळाली. शिक्षणाच्या सुविधाप्रमाणे दर्जा वाढला असून, मंचर गाव समृद्ध झाले आहे. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरांचा गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आहे. गावाच्या पश्चिम-उत्तर-पूर्व दिशेने पावसाळ्यात एक छोटासा ओढा झुळूझुळू वाहत होता. स्फटिकासारखे शुभ्र असलेले पाणी माणसं प्यायची देखील. परंतु, हे शुभ्र पाणी आता राहिले नाही. त्याची स्थिती सध्या गटार गंगेसारखी झाली आहे.

बाजारपेठची भरभराट
सोन्या-चांदीसाठी अंदूशेठ पेढी, बाबूभाई शहा, माउली काजळे यांची पेढी; तर किराणा मालासाठी पुंगलिया बंधू, खुडे ब्रदर्स प्रसिद्ध होते. मनोरंजनासाठी असलेल्या (स्व.) विठ्ठलराव बाणखेले यांच्या विकास थेटरनेही काळानुसार आमूलाग्र बद्दल केला आहे. मंचर फोटो, अनुराधा व संगम हे तीनच फोटो स्टुडिओ होते. रामशेठ थोरात यांचे मयूर, विठ्ठलराव चिखले यांचे हॉटेल विसावा, महाजन हॉटेल तसेच टेमकर मावशी व मारुती म्हसे यांचे चहाचे दुकान व श्रीकृष्ण दुग्धालय आजही प्रसिद्ध आहे. महाजन व गुळवे यांच्याकडे साखरेची गडंगनेरे, कंदी पेढे व रेवड्या तयार होत होत्या. राहणे यांचे वर्षा लंच होम, सखाराम बागल यांचे समाधान व आचार्य यांची खानावळ होती. एकमेव समाधान लॉज होते. त्यांनतर विसावा लॉज सुरू झाले. यादवराव व प्रतापराव पडवळ बंधू व हनीफ यांची सायकल दुकाने होती. मोटार सायकल, ट्रक, कार व जीप ही वाहने फारच कमी लोकांकडे होती. प्रकाशशेठ शहा भंडारी कुटुंब यांची कापड दुकाने होती. (स्व.) बाळासाहेब लक्ष्मण बाणखेले कुटुंबीयांचा मित्रसागर हा एकमेव पेट्रोल पंप होता. तेथेच, पहाटेच दैनिक ‘सकाळ’चे अंक उतरवले जात होते. विष्णू बाणखेले व भैजी बनबेरु यांचा हुंडेकरी व्यवसाय होता. पंधारे, गांजाळे यांच्या प्रिंटिंग प्रेस होत्या. वसंत गुंजाळ, नामदेव पोखरकर, मारुती ठोंबरे, छाया पडवळ, भगवान निघोट, शंकरराव माने, कुंडलिक गावडे हे नावाजलेले वकील म्हणून प्रसिद्ध होते. पादत्रानांसाठी मधू फूटवेअर होते.

संपर्क सुविधांचा अभाव
टेलिफोन मिळण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत होते. घरात फोन आल्यानंतर पूजा करून आजूबाजूच्या लोकांना पेढे वाटले जात होते. ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही मोजक्या कुटुंबांकडे होते. पोस्टमन घरासमोर थबकला व त्याने पत्र दिले की, आनंद गगनात मावेनासा होत होता. आतामात्र मोबाईलमुळे पोस्ट कार्यालय व पोस्टमनशी संपर्क दुरावला आहे.

विकास कामांना चालना
गावातील सगळे रस्ते मातीचे होते. त्यामुळे पावसाळ्यात चिखल तुडवत प्रवास करावा लागत होता. सन १९९० मध्ये दिलीप वळसे पाटील प्रथम आमदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्याची कामगिरी केली. रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय, क्रीडासंकुल, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा व अन्य सुविधा, कृषी बाजार समितीच विस्तार केल्यामुळे कांदा, बटाटा, टोमॅटो या बाजाराची कीर्ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. हजारो हातांना काम मिळाले आहे. आर्थिक स्तर उंचावला आहे. लहान मोठी चाळीसहून अधिक हॉटेल असून, सर्वच हॉटेल व्यवसायिकांना ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी दोन, चार चाकी वाहने उभी असून टँकर, ट्रक व कंटेनर असणाऱ्या कुटुंबाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बँका व पतसंस्थाची उलाढाल कोट्यवधी रुपयांची झाली आहे. आर्थिक स्तर उंचावला असून, मंचरची वाटचाल शहराकडे वेगाने सुरू झाली आहे. एकेकाळी गावठाणापुरते मर्यादित असलेले मंचर आता दोन ते तीन किलोमीटर अंतरात पसरलेले आहे. नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यामुळे व पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे येथूनच जात असल्यामुळे शहराच्या भरभराटीला वेग येणार आहे. लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचेही मंचरच्या परिवर्तनात योगदान मोठे आहे.

बाजारपेठेला अच्छे दिन..
व्यापार व उद्योग व्यवसाय वाढल्यामुळे तसेच तीन किलोमीटर अंतरावर शासकीय अभियांत्रिकी व तंत्र निकेतन ही महाविद्यालय सुरु झाल्याने मंचर बाजार पेठेला अच्छे दिन आले आहेत. लक्ष्मी रोड, मुळेवाडी या दोन रस्त्यावर लहान मोठे उद्योग व्यवसाय भरभराटीला आले आहेत. मंचर नगरपंचायतीसह शहरात तीन ते चार मजल्याच्या अनेक इमारती डौलाने उभ्या आहेत. गेटवेल, संजीवनी, सिद्धकला, प्रांजल, विनायक खेडकर, डॉ. तोडकर, डॉ. खिलारी, सिद्धी, डॉ. पोखरकर, मॅक्स केअर, डॉ. मांढरे डेंटल, हरीरूप डेंटल, डॉ. गुजराथी, उपजिल्हा रुग्णालय आदी रुग्णालयामध्ये पुण्या-मुंबईप्रमाणे अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर येथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या होतात.

अर्थकारणाला पाठबळ
शरद बँक, लाला बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेन्ट्रल बँक, भारतीय स्टेट बँक, या पाचच बँका होत्या. आता राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांची व पतसंस्था, अशी एकूण संख्या ३२ च्या पुढे गेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी संकुल उभे केले आहे. येथील शेतीमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी बाजार समिती काम करत आहे. खरेदी-विक्री संघामार्फत बी-बियाणे व खते सवलतीच्या दरात दिली जातात.

पौराणिक वारसा
पौराणिक मणिपूरचे रूपांतर मंचर झाले, अशी आख्यायिका आहे. येथे पुरातन तपनेश्वर मंदिर आहे. अतिशय उत्कृष्ट बांधकाम शैलीतील टोलेजंग पांडवकालीन बारव पहावयास मिळते. पांडवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, असे सांगतात. या भूमीत त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील नाथ संप्रदायाची दिंडी श्री क्षेत्र पारूंडे (जुन्नर) मार्गे दर बारा वर्षांनी तपनेश्वराच्या प्रांगणात मुक्कामी थांबते.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नेहमी मंचर भूमीत महाजन कुटुंबाकडे मुक्कामी थांबत होते. त्यांनी महाजन घराण्याला मंचरला लिहिलेले ५३७ अभंग प्रसाद म्हणून भेट दिले. हा ग्रंथ ‘मंचरी’ ग्रंथ म्हणून ओळखला जातो. आजही आपल्याला लिखित स्वरूपात राजेंद्र सदाशिव महाजन यांच्याकडे जतन केलेला ग्रंथ बघायला मिळत आहे. विठ्ठल मंदिराची सनद महाजन कुटुंबाला पेशव्यांप्रमाणेच सन १८८५ मध्ये ब्रिटिशांनी कायम केली. त्यावेळी वर्षाला ११ रुपये मेहनताना महाजन कुटुंबाला मिळत होता.
श्री क्षेत्र भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरमधूनच जावे लागते. पुरातन काळातील तपनेश्वर मंदिर व पांडवकालीन बारव यामुळे ऐतिहासिक खुणा टिकून आहेत.

मंचर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी कामाला सुरवात केली आहे. कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बगीचा, सदनिका धारक व व्यावसायिकांची थकबाकी हे मुख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी नगरपंचायत कशा पद्धतीने पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.