
कचऱ्याच्या ढिगावर आढळले नवजात अर्भक
मंचर, ता. ९ : स्त्री जन्माचे स्वागत करा असा नारा सर्वत्र दिला जात असताना जन्मदात्यांनीच मुलगी झाली म्हणून नवजात अर्भकाला पिशवीत घालून कचऱ्याच्या ढिगावर ठेवले. ही घटना मंचर शहरात शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. अशा प्रकारे नवजात बालक बेवारस सापडण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे मंचर परिसरात खळबळ उडाली आहे. सदर बालकाची प्रकृती स्थिर असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचे काम मंचर पोलिसांनी सुरू केले आहे.
सदर बालकाला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकात बाजार पेठेत बेवारस नवजात बालक असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक अमित काटे, गौरव बारणे व अमर बारवकर यांना मिळाली. ते तातडीने घटनास्थळी गेले. त्यावेळी बाळ रडत होते. रुग्णवाहिकेतून बालकाला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून सदर माहिती मंचर पोलिसांना कळवण्यात आली. सदर बालकाला पिशवीत घालून कचऱ्याच्या ढिगावर ठेवले होते. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजेंद्र हिले व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी भैरवनाथ गल्ली, बाजारपेठ व छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू झाली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या नवजात बालकाची प्रकृती उत्तम आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तीन ते पाच दिवसांची बालिका आहे. माझ्यासह डॉ. सुशील कांबळे, डॉ. श्रीकांत चव्हाण, डॉ. प्रशांत पवार, डॉ. बाबुल पांडे तातडीचे उपचार करत आहेत. दुपारी तीन वाजता बालक मिळाले याचाच अर्थ दुपारी बारा ते एकच्या दरम्यान त्याला बेवारस अवस्थेत सोडून कुणीतरी गेले असावे. त्याची शुगर व अन्य चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
डॉ. कांचन गावडे, बाल रोग तज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय मंचर