
मंचर, अवसरी परिसरामध्ये होळीचे साहित्य ओलेचिंब
मंचर, ता.७ : मंचर शहर व परिसरातील अवसरी खुर्द परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे होळी सणानिमित्त अनेकांनी घरासमोर गौऱ्या व अन्य साहित्य रचून ठेवले होते. यामुळे होळीचे साहित्य ओलेचिंब झाले. तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले.
पिंपळगाव-खडकी, चांडोली खुर्द, एकलहरे, गावडेवाडी, तांबडेमळा, शेवाळवाडी, लांडेवाडी, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, चिंचोली,भोरवाडी आदी गावात सोमवारी (ता.७)रात्री सात ते आठ या वेळेत अवकाळीसह काही ठिकाणी गारा पडल्या. शेतातील कांद्याच्या ढिगावर संरक्षणासाठी ताडपत्र्या टाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. शेतात कापणी झालेल्या गव्हाच्या पेंड्या भिजल्याच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान रात्री सात ते रात्री ११ या कालावधीत वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कंदील, मेणबत्तीचा आधार घ्यावा लागला.