
एकलहरे येथे बिबट्याकडून दोन बकऱ्या फस्त
मंचर, ता. १६ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गलगत मंचरच्या जवळ असलेल्या एकलहरे (ता. आंबेगाव) येथे बागवस्तीवर राहणारे शेतकरी विवेकानंद चंद्रकांत रोकडे यांच्या घरासमोर गुरुवारी (ता. १६) सकाळी ११च्या सुमारास गोठ्यातील दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे रोकडे यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घराजवळ बकरे बांधून रोकडे कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम उरकून दुपारी बारा वाजता घरी आले. दोन्ही बकरे रक्तबंबाळ झाल्याचे पाहून रोकडे कुटुंब सुन्न झाले. घटनास्थळी सरपंच राणी खैरे, उपसरपंच प्रीती डोके आणि ग्रामपंचायत सदस्य सुशील देठे यांनी ताबडतोब भेट दिली. वनखात्याशी संपर्क केला. पण, संप सुरु असल्याने वन खात्याकडून पंचनामा झाला नव्हता. वनविभागाने येथे लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.