दीड महिन्यांत ८ बछड्यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड महिन्यांत ८ बछड्यांचा मृत्यू
दीड महिन्यांत ८ बछड्यांचा मृत्यू

दीड महिन्यांत ८ बछड्यांचा मृत्यू

sakal_logo
By

मंचर, ता. १९ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या दीड महिन्यात आठ बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील दोन, दीड महिन्यांचे दोन, १५ दिवसांचे दोन व ४० दिवसांच्या दोन बछड्यांचा समावेश आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार आईची ऊब, दूध न मिळाल्याने उपासमारी व थंडीमुळे मृत्यू झाल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.
विधानसभेत प्रश्नोत्तरे तासात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बिबट्यांची वाढत चाललेली संख्या व मानवावर होत असलेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत वनखात्याने तातडीने उपयोजना हाती घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. ते म्हणाले, ‘‘बिबट्यांची संख्या हा शहरी व ग्रामीण भागात वाढता प्रश्न असून, बिबटे माणसांवरही हल्ले करू लागले आहेत. मतदारसंघात १५ दिवसांपूर्वी चार बिबटे मृतावस्थेत आढळले. त्यांचे शवविच्छेदन केल्यावर उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल आला आहे. बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्याचे नियोजन वनअधिकाऱ्यांकडे आहे. ते समजून घेऊन प्रजनन कमी करता आले; तर त्याचा फायदा होईल.’’

‘दोन वर्षांपर्यंत आईसोबत असणे गरजेचे’
याबाबत ‘सकाळ’ प्रतिनिधीने मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधला त्या म्हणाल्या, ‘‘बिबट्या दोन वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईसोबत असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला दूध व सकस आहार मिळतो. पण, ऊसतोडणी सुरु असल्याने बिबटे सैरावैरा झाले आहेत. अनेकदा मादी जागा बदलत असते. अशावेळी आई व बछड्यांची ताटातूट होते. त्यांना दूध मिळत नाही. उपासमारीमुळेच बछड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. सापडलेले बछडे वनकर्मचाऱ्यांमार्फत सुखरूपपणे मादीच्या सहवासात जातील, अशा पद्धतीचे काम सुरु आहे. गेल्या दोन महिन्यात सहा बछड्यांना मादीकडे सुपूर्त करण्यात वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.’’