
मंचरच्या थकबाकीदारांना नगरपंचायतीकडून इशारा
मंचर, ता. २० : ‘‘मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीची घरपट्टी व नळपट्टीची थकबाकी रक्कम चार कोटी ६५ लाख ४० हजार रुपये आहे. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी नगरपंचायतीने धडक मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १९ नळ कनेक्शन तोडण्यात आली असून, ही कारवाई अधिक तीव्र होईल. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी व घरपट्टीची रक्कम त्वरित नगरपंचायतीकडे जमा करावी,’’ असे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘नगरपंचायतीची मागील व चालू थकबाकीची रक्कम सात कोटी ६७ लाख ९० हजार रुपये आहे. त्यापैकी वसूल ३ कोटी दोन लाख ४९ हजार रुपये झाला आहे. नगरपंचायत कार्यालय व रस्त्यावरील विजेचे दिवे बिल तीन कोटी रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीने याबाबत तगादा सुरू केला आहे. वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी शासनाकडून मिळणारी विविध अनुदान निधी चालू वर्षाच्या वसुली रकमेवर आधारित आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण वाढणे फार गरजेचे आहे. सध्या वसुलीचे प्रमाण ३९.३९ टक्के आहे. १ एप्रिल पासून थकबाकी रकमेवर दोन टक्के दराने शास्ती लावली जाणार आहे. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी ३१ मार्चपूर्वी वसुली पथकाकडे किंवा नगरपंचायतीमध्ये नळपट्टी व घरपट्टीची रक्कम भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे.’’