
महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा : अविनाश रहाणे
मंचर, ता. २१ : ‘‘मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित करून नवजात बालके व अतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची ईडी किंवा राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी,’’ अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक ॲड. अविनाश रहाणे यांनी केली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर ॲड. रहाणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आंबेगाव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संतोष गावडे, सुरेश निघोट उपस्थित होते.
ॲड. रहाणे म्हणाले, ‘‘उपजिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाचे आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भवारी यांनी येथे अत्यवस्थ रुग्ण आहेत. वीजबिल भरण्याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक औंध हॉस्पिटल यांच्याशी चर्चा झाली आहे. ३१ मार्चपूर्वी थकबाकी वीजबिल रक्कम भरू. वीज खंडित करू नका, अशी विनंती महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. पण, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खासगी सावकाराप्रमाणे रुग्णांचा विचार न करता वीज पुरवठा खंडित केला. ही घटना लोकशाहीमध्ये घातक आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे गैरव्यवहार उघडकीस आणले जातील.’’
‘‘रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या महावितरण कंपनीविरुद्ध वेळप्रसंगी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,’’ अशी मागणी राजू इनामदार यांनी केली.