
मंचरला कांदा पिशव्यांची विक्रमी आवक
मंचर, ता. ३० : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५२ वर्षात प्रथमच गुरुवारी (ता.३०) ९० हजार कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. बाजार समितीच्या आवारात शुक्रवारपर्यंत (ता.३१) विक्री केलेल्या कांद्याला प्रती क्विंटलला ३५० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला आहे. कांद्याचे बाजारभाव कोसळले असून, प्रती क्विंटल ६०० ते ७०० रुपये बाजारभाव व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक चिंतेत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी खुर्द, आदर्शगाव गावडेवाडी, रांजणी, सातगाव पठार, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, लांडेवाडी, आदर्शगाव भागडी, जवळे, भराडी, पिंपळगाव खडकी, चांडोली खुर्द, चांडोली बुद्रुक, घोडेगाव, शिनोली, वळती तसेच शिरूर, खेड व जुन्नर तालुक्यातील काही गावातून येथे कांदा पिशव्यांची आवक झाली.
चाकण, पुणे, या भागातून व्यापारी कांदा खरेदीसाठी येथे आले आहेत. अजूनही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा पिशव्या शिल्लक आहेत. कांदा अनुदानाची मुदत ता.३१ मार्च आहे. सदर मुदत राज्य शासनाने वाढून द्यावी.
- बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, माजी संचालक, बाजार समिती
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९७१ मध्ये झाली. आत्तापर्यंत सर्वात उच्चांकी कांद्याची आवक झाली आहे. संपूर्ण बाजार समितीचा आवर कांदा पिशव्यांनी भरगच्च झाला आहे. शेडमध्ये जागा उपलब्ध नसल्याने बाजार समितीच्या आवारात रस्त्यावरच कांदा पिशव्या ठेवल्या आहेत.
- सचिन बोऱ्हाडे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर
07812