
मंचरला बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मंचर, ता. १० ः मंचर शहरात चोहोबाजूंनी बिबट्यांचा वावर वाढला आहे. सोमवारी रात्री जुन्या चांडोली रस्त्याजवळ जाधव मळा येथे राहणारे शेतकरी रवी तुकाराम जाधव यांच्या घरासमोर असलेले दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यातच मंचर शहराच्या पूर्वेला श्रीराम गांजाळे यांच्या बंगल्याच्या सभोवती असलेले सहा फूट उंचीची संरक्षण भिंत ओलांडून त्यांचा कुत्रा बिबट्याने उचलून नेला. माजी सैनिक रवींद्र थोरात यांच्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात यापूर्वी दोन बिबटे कैद झाले आहेत. दुचाकीस्वार यांच्यावर हल्ले झाल्याच्या व अनेक कुत्री फस्त केल्याच्या सतत घटना घडत आहेत.
सोमवारी (ता. ८) रोजी रात्री अकराच्या सुमारास जाधव यांच्या घरासमोरून दोन बिबटे फिरत होते. यासंदर्भात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाला ही घटना कळविण्यात आली आहे. दोन पिंजरे लावून दोन्ही बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी तुकाराम जाधव, शिवाजी जाधव, वसंत जाधव यांच्यासह नागरिकांनी केली आहे.