
माळेगाव-पणदरे गटात ५६ कोटींची रस्त्यांची कामे
माळेगाव, ता. ३० ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून माळेगाव-पणदरे (ता. बारामती) जिल्हा परिषद गटातील रस्त्यांसाठी नव्याने सुमारे १५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये माळेगाव बुद्रुक शिवनगर ते २२ फाटा रस्त्यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. तसेच माळेगाव कारखाना ते धुमाळवाडी भिकोबानगर रस्त्यासाठी ९ कोटी ५३ लाख रुपये खर्च होणार आहेत. यापूर्वीही वरील जिल्हा परिषद गटात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या सुमारे ५६ कोटींच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांनी दिली.
माळेगाव- पणदरे जिल्हा परिषद गटांर्तगत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी तावरे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तावरे म्हणाल्या, ‘‘माळेगाव आणि पणदरे गटात रस्त्यांसाठी नव्याने मंजूर झालेल्या १५ लाख रुपयांच्या निधीमुळे आगामी काळात संबंधित गावकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस वाहतूक करताना रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.’’
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्णत्वाला आलेल्या रस्त्यांची नावे पुढील प्रमाणे ः कऱ्हावागज ते सायंबाचीवाडी रस्ता (३ किमी), मानाप्पावस्ती ते कोकरे सोलणकरवस्ती रस्ता (६ किमी), पणदरे ते चिंचेचामळा रस्ता (३ किमी), पाहुणेवाडी ते पठारवस्ती रस्ता (१ किमी), थोपटेवाडी चौफुला ते सोलनकरवस्ती रस्ता (६ किमी), आंदोबावाडी ते शारदानगर रस्ता (अडीच किमी) पूर्ण झाला आहे. याशिवाय प्रगतिपथावर असलेल्या रस्त्यांमध्ये कठीणपूल-पवईमाळ ते माळेगाव बुद्रुक रस्ता (११ किमी), दुरगाडेवस्ती ते टेंगलफाटा, खोपटेवस्ती, माळवाडी हायस्कूल (साडेपाच किमी), ढाकाळे ते भिलारवाडी जळगाव कडेपठार रस्ता (६ किमी), अहिल्यानगर ते पवईमाळ पणदरे रस्त्याचा समावेश आहे.
आम्ही केवळ पोस्टमन...!
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात माळेगाव पणदरे जिल्हा परिषद गटाच्या हद्दीत खरेतर अजितदादांनी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. अर्थात अजितदादांनी मंजूर केलेल्या विकास कामांची माहिती पोस्टमनप्रमाणे लोकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी आम्हा पदाधिकाऱ्यांची असते, असे तावरे म्हणाल्या.
Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00646 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..