पोलिसांमुळे सुरक्षिततेचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांमुळे सुरक्षिततेचे वातावरण
पोलिसांमुळे सुरक्षिततेचे वातावरण

पोलिसांमुळे सुरक्षिततेचे वातावरण

sakal_logo
By

माळेगाव, ता. ७ : ‘‘कायदा हातात घेऊन कोणी कसलाही अल्टिमेटम दिला, तरी पोलिसांनी ठरविले तर कोणी काहीही करू शकत नाही. या राज्यात सर्वजण सुरक्षित व निर्भयपणे राहू शकतात. तसे सुरक्षिततेचे वातावरण अबाधित ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. तशाच पद्धतीचे चांगले काम राज्याचे पोलिस हे राजकारण्यांना बळी न पडता करत आहेत. हे सध्याच्या संवेदनशिल वातावरणात स्पष्ट होते,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे रोहिणी रविराज तावरे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद गटामधील विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य, विविध ग्रामपंचायतींना कचरा कुंड्या, भजनी मंडळांना साहित्य वाटप अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा धागा पकडत ते म्हणाले, ‘‘पवारसाहेब हे माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत राहतात. याशिवाय येथील कार्यरत शिक्षण संस्था, साखर कारखान्यांसारखे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय आणि सर्व जातिधर्मांतील लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. असे असताना गटातटाच्या राजकारणापायी येथे गोळीबार होतो, हे बारामतीकरांच्या दृष्टीने आणि आम्हा लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने अतिशय अशोभनीय गोष्ट आहे. पवारसाहेबांनाही ती गोष्ट खटकली. त्यामुळे पोलिसांना माझी सूचना राहील, की माझ्या जवळचा असो अथवा दुसऱ्या पक्षाचा असो, जो कोण कायदा हातात घेईल, त्याला तडीपार करा. त्यावरही त्याच्यामध्ये बदल होत नसेल, तर थेट मोका कारवाई करून टाका. त्यासाठी आम्हा राज्यकर्त्यांच्या आदेशाची वाट पाहू नका.

पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार
यावेळी माळेगावकरांना गटातटाच्या राजकारणात न पडता विकासाला महत्त्व देत एकत्र येण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. ते म्हणाले, ‘‘बारामती शहराच्या तुलनेत माळेगावचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी अर्थ विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. त्यामध्ये पंचायतीची प्रशस्त इमारत, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, दिवाबत्तीच्या सुविधा पूर्णत्वाला येणार आहेत. या गोष्टी कमी कालावधित अधिक दर्जेदार करण्यासाठी आगामी माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील गटातटाचे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही.’’

नगरपंचायतीला मिळणार गायरान
‘‘माळेगाव नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्याने येथे विकास कामांसाठी जागेची उपलब्धता होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या गावातील गायरान क्षेत्र महसूल विभागाने ताब्यात घेऊन नगरपंचायत प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, त्यानंतर गावात अधिकच्या जमिनी असतील, त्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकण्याचा विचार केला जाईल. नीरा-बारामती हा राज्यमार्गही रुंदीकरणाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहे. त्याकामीही संबंधित गावकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी,’’ असे आवाहन पवार यांनी केले.

mal7p1

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00655 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top