बारामतीत भाजपकडून संघटनात्मक बांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत भाजपकडून संघटनात्मक बांधणी
बारामतीत भाजपकडून संघटनात्मक बांधणी

बारामतीत भाजपकडून संघटनात्मक बांधणी

sakal_logo
By

माळेगाव, ता. १० : लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या साखर पट्ट्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा शुक्रवारपासून (ता. ११) दोन दिवसांचा दौरा होणार आहे. त्यासाठी साखर कारखानदारीमधील पवार विरोधकांनी या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. ते पाहता शेतकरी, शेतमजुरांचा संघटनात्मक कसा प्रतिसाद मिळतो, याबाबतची उत्सुकता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघावरील पकड मजबूत करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी निवडणुकीत जोरदार आव्हान देण्याचे नियोजन भाजपकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचा मतदार संघात दुसरा दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्याची पूर्व तयारी करण्याच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी बारामतीमध्ये येत आहेत. ते संघटनात्मक चर्चा साखर पट्ट्यातील नेतेमंडींशी करणार आहेत.

बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या बाजूने निकाल मिळविण्यासाठी सुळे यांचे बारामती तालुक्यातील मताधिक्य कमी करण्याचे आव्हान आमच्या पुढे आहे, असे भाजपचे नेते दिलीप खैरे, अविनाश मोटे, युवराज तावरे यांनी सांगितले. खैरे म्हणाले, ‘‘भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शहा, गडकरीसाहेब, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये इथेनॉलसह साखर हमी भाव आदी निर्णय साखर उद्योगाला संजीवनी देणारे ठरले आहेत. याशिवाय ग्रामपंचायतींना थेट निधी, गडकरींच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे बारामतीसह सर्वत्र झाली आहेत. त्यामुळे अशा लोकहिताच्या मुद्यांच्या आधारे आम्ही बारामतीकरांपुढे जाणार असून, त्यांचे मत परिवर्तन करणार आहे.’’

तावरे यांच्या घरी मुक्काम
बारामतीमधील कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा आणि राहण्याचा फंडा भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी काढला आहे. बारामतीमध्ये याआगोदर भाजप असो अथवा राष्ट्रवादीसह कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ मंत्री, नेता हा पवार कुटुंबीयांच्या घरी गेला आणि राहिला आहे. परंतु, आता पहिल्यांदाच बारामतीमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे बारामतीचे भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या सांगवी येथील घरी मुक्काम करणार आहे. भाजपची ही रणनीती कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने जमेची ठरणार आहे, अशी चर्चा आहे.