विवाह मंडपातूनच उठली अंत्ययात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाह मंडपातूनच उठली अंत्ययात्रा
विवाह मंडपातूनच उठली अंत्ययात्रा

विवाह मंडपातूनच उठली अंत्ययात्रा

sakal_logo
By

माळेगाव, ता. २४ : घरात लग्नसोहळा असला की वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद आणि उत्साहाला पारावार राहत नाही. तसेच आनंदी वातावरण माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील येळे कुटुंबीयांमध्ये होते. परंतु, लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांतच या कुटुंबीयांच्या आनंदावर काळाने दुर्दैवी घाला घातला. नवरा मुलगा सचिन ऊर्फ बबलू अनिल येळे (वय २५) याचे गुरुवारी (ता. २४) पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लग्नाच्या निमित्ताने घरासमोर उभारलेल्या मंडपातच नवरा मुलगा सचिन याचा मृतदेह ठेवण्याची वेळ कुटुंबीयांवर आली
माळेगाव साखर कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे यांचा तिसरा मुलगा सचिन याचा विवाह परभणी येथील हर्षदा हिच्याशी शनिवार (ता. १९) शारदानगर येथे मोठ्या उत्साहात  झाला. त्यानंतर या नववधू-वरांनी रविवारी व सोमवारी देवदर्शन केले. लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा मंगळवारी (ता. २२) झाली. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री सचिन याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. नातेवाइकांनी त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी बारामती शहरात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबतची माहिती गुरुवारी पहाटे वाऱ्यासारखी पसरली आणि माळेगावसह परिसरात अनेकांना धक्का बसला. नातेवाइकांसह माळेगावकरांनी सचिन याच्या अंत्यविधीला मोठी गर्दी केली होती. सचिन याच्या आई-वडिलांसह नातेवाइकांचा लग्न मंडपातील आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या दुःखद घटनेने माळेगाव परिसरात कमालीची शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे.

नववधूचे स्वप्न उद्ध्वस्त!
माळेगावमध्ये येळे कुटुंबीयांमध्ये सून म्हणून आलेल्या हर्षदा हिच्या हातामधील चुडा, मेंदी आणि अंगावरील हळद तशीच होती. असे असताना संसाराच्या सुरवातीलाच अचानकपणे पती सचिन याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे तिचे स्वप्न पूर्णतः उद्ध्वस्त झाले.