पणदरे येथे नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पणदरे येथे नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला
पणदरे येथे नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला

पणदरे येथे नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला

sakal_logo
By

माळेगाव, ता. १३ : बारामती तालुक्यातील १२ हजार लोकसंख्येच्या पणदरे गावाला राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठा आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत येथील पुढाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. येथे १५ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर थेट जनतेमधून सरपंच होण्यासाठी ४ जणांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.
या निवडणुकीत भैरवनाथ सिद्धेश्वर पॅनेलचे प्रमुख तानाजी कोकरे, एस. एन. जगताप, स्वप्नील जगताप, मंगेश जगताप, बी. डी. कोकरे आदी नेत्यांविरुद्ध गिताई ग्रामविकास पॅनेलच्या विद्यमान सरपंच मीनाक्षी जगताप, शशिकांत कोकरे, माजी उपसरपंच सत्यजित जगताप, कार्यकर्ते विक्रम कोकरे आदींनी तगडे आव्हान उभे केले. त्यामुळे गावात संबंधित गावपुढाऱ्यांसह उमेदवारांनी प्रचाराच्या निमित्ताने चांगलाच धुरळा उडविला आहे.
एकाबाजूला भैरवनाथ सिद्धेश्वर पॅनेल प्रमुखांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांनी एकाधिकारशाहीने कारभार केला व मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, तर तो आरोप खोडून काढत गिताई पॅनेलच्या प्रमुखांनी पणदरेकरांच्या अपेक्षेनुसार विकास कामे पूर्णत्वाला आणल्याचे सांगितले. तसेच, पणदरेकरांची सेवा निरपेक्ष भावनेतून केल्यानेच पाच वर्षात दोन वेळा (अविश्वास ठरावासह) थेट जनतेमधून सरपंच मीनाक्षीताई विजयी झाल्या. त्याची पुनरावृत्ती गिताई पॅनेलच्या माध्यमातून चालू निवडणुकीतही दिसून येईल, असा दावा कार्यकर्ते धनसिंग कोकरे यांनी केला.
दरम्यान, पणदरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यानुसार गिताई पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार प्रसाद आनंदराव सोनवणे विरुद्ध भैरवनाथ पॅनेलचे उमेदवार अजय कृष्णा सोनवणे यांच्यात चुरस दिसून येत आहे. त्यांच्याबरोबर अरुण मोरे, विशाल दिलीप घोरपडे हे अपक्ष उमेदवार नशीब आजमावीत आहेत.

‘माळेगाव’चे आजी-माजी संचालक मैदानात
माळेगाव साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक असलेले अनेक नेतेमंडळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरले आहेत. ज्येष्ठ संचालक तानाजी कोकरे, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, माजी संचालक एस. एन. जगताप यांनी भैरवनाथ सिद्धेश्वर पॅनेलच्या बाजूने खिंड लढवत आहेत. माजी संचालक बाबा (चेतन) जगताप हे स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असून, त्यांच्याविरुद्ध माजी उपसरपंच सत्यजित जगताप यांनी माजी संचालक शशिकांत कोकरे यांच्या नेतृत्वाखाली दंड थोपटले. या दोन्ही उमेदवारांनी एकविचाराने अनेकवर्षे राजकारण केले, परंतु यंदाच्या निवडणुकीत एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. या लढतीत कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तशीच काही स्थिती अमित कोकरे विरुद्ध विक्रम कोकरे यांच्यामध्ये आहे.