मानवी जीवनाच्या सुखकर वाटचालीत तंत्रज्ञानाचा वाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवी जीवनाच्या 
सुखकर वाटचालीत 
तंत्रज्ञानाचा वाटा
मानवी जीवनाच्या सुखकर वाटचालीत तंत्रज्ञानाचा वाटा

मानवी जीवनाच्या सुखकर वाटचालीत तंत्रज्ञानाचा वाटा

sakal_logo
By

मानवी जीवनाच्या
सुखकर वाटचालीत
तंत्रज्ञानाचा वाटा

संगणक, इंटरनेट व मोबाईल या तीन साधनांमुळे जीवन तर सुखकर झालेच, शिवाय वेगवान उद्योगधंदे विकसित होण्यासाठी त्या साधनांचा चांगला उपयोग झाला. वेळ, श्रम व पैसा वाचविणारी साधने, असे एका ओळीत या साधनांचे वर्णन करावे लागेल. बदलत्या काळात आता या तीन साधनांचा वापर करता येणे अनिवार्य बनत चालले आहे. कोणत्याही क्षेत्रासाठी तुम्हाला या गोष्टींचे किमान ज्ञान गरजेचे आहे. या साधनांमुळे कामांचा वेग वाढला आहे. शहरी व ग्रामीण ही दरी त्यामुळे कमी होत आहे, हा सर्वांत मोठा बदल म्हणावा लागेल.

- कुलभूषण कोकरे, पणदरे (ता. बारामती)

गेल्या काही वर्षांत संगणक, इंटरनेट व मोबाईल या तीन क्षेत्रांत वेगाने क्रांती झाली. त्याचा वेग आजही कमालीचा आहे. त्याने माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने सुखकारक बनवले. ऑनलाइन प्रणाली ही तर सर्वांनाच कमालीचा दिलासा देणारी ठरत आहे. भारतीय मानसिकतेनेही या प्रणालीला सहजतेने आत्मसात केलेले दिसते. हल्ली सर्वच बाबींमध्ये ऑनलाइन प्रणालीचा होणारा वापर हा सर्वांसाठीच सुखदायक ठरत आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक टप्प्यावर डिजिटल क्रांतीने परिवर्तन घडविल्याचे आपण अनुभवतो आणि आपण त्याचा एक हिस्सा बनलो आहोत. कोणत्याही क्षेत्रात काम करत असला, तरी आपल्याकडे काही मूलभूत गोष्टींची निकड आहे. या गोष्टी चैनीच्या नसून, त्या अत्यावश्यक प्रणालीत मोडणाऱ्या आहेत. यात स्मार्टफोन, डेबिट व क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग प्रणाली, लॅपटॉप किंवा टॅब, स्वतःचा ई-मेल यांचा समावेश आहे. कमी पगाराची नोकरी असो किंवा एखादा छोटा व्यावसायिक, त्याला या गोष्टी दर महिन्यात कराव्या लागतातच. त्यामुळे त्याला वेळ, पैसा व श्रम वाचविता येतात.

आपण काय करू शकतो
स्मार्टफोन असेल तर महावितरण, सर्व मोबाईल कंपन्या, बीएसएनएल, एलआयसी, सर्व विमा कंपन्यांसह सर्व महत्त्वाच्या मोठ्या कंपन्यांनी आपापली अॅप विकसित केलेली आहेत. त्यामध्ये एकदा लॉगइन केले की तुम्ही खालील गोष्टींचा भरणा सहजतेने जागेवरून करू शकता. त्यात मोबाईल, वीज, लँडलाइन यांचे बिल, एलआयसीचा हप्ता, नगरपालिकेची पाणीपट्टी व घरपट्टी, मोबाईल रिचार्ज, बँकेच्या कर्जाचा हप्ता, विमा हप्ता, रेल्वे, विमान, बस बुकिंग, सिनेमाचे तिकीट, हॉटेल बुकिंग, ऑनलाइन पासपोर्ट अर्ज दाखल करणे, परदेशातील अनेक गोष्टींचे बुकिंग करणे, पैशांची देवाणघेवाण आदींचा समावेश आहे. क्रेडिट कार्डचा योग्य वापर अधिक लाभदायक ठरत आहे. अनेक बँका आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्डची सवलत देतात. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. अनेकांना क्रेडिट कार्ड वापरणे धोकादायक वाटते; परंतु बँका आपली पत पाहूनच आपल्याला क्रेडिट कार्ड देत असतात. आपल्या खिशात पैसे नसतानाही एखादी वस्तू आवडली, तर क्रेडिट कार्डने आपण ती सहजतेने खरेदी करू शकता. हा त्याचा मोठा फायदा आहे. ठरलेल्या दिवशी बॅंक आपल्या खात्यातून ही रक्कम वळती करून घेते, ही तारीखही निश्चित असते. त्यामुळे त्या दिवशी खात्यात तेवढी रक्कम ठेवल्यास काहीही अडचण येत नाही. डेबिट कार्डासोबतच आता क्रेडिट कार्ड खिशात असणे अत्यावश्यक आहे. तातडीच्या प्रसंगी आपल्याला त्याची मदत होऊ शकते.

विकासासाठी वेळ द्यायला हवा
तंत्रज्ञानाच्या मदतीने नोकरी, व्यवसाय, व्यक्तिमत्त्व विकास, नव्या संधी, अशा अनेक बाबतींत आपण वेगाने वाटचाल करू शकतो. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकच्या चॅटवर किती वेळ वाया घालवायचा आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या व्यवसाय किंवा नोकरीच्या कामात किती सुधारणा शक्य आहे, याचे संशोधन करण्यासाठी किती वेळ घालवायचा, हे आपले आपणच ठरवायचे आहे. इंटरनेटने जगाच्या रेषा धुसर बनविल्या आहेत; मात्र या इंटरनेटचा वापर आपण कशासाठी करतो, त्यावर बरेच अवलंबून आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आपली सर्वांगीण प्रगती साध्य करण्यावरच अधिक भर देण्याची गरज आहे.

सहकारातही तंत्रज्ञानाला पसंती

भारताच्या अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. खासगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्राच्या बरोबरीने सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सहकार चळवळीतील सर्व घटकांच्या सहकार्याच्या भावनेतून संस्था उदयास आल्या व परस्पर कल्याणासाठी एकविचाराने एकत्र आलेल्या व्यक्तींनी या संस्था जोपासल्या.स्वतःचे असे वेगळे स्थान वित्त उत्पादन व सेवा क्षेत्रात निर्माण केले. विशेषतः महाराष्ट्रात सहकार चळवळीने ग्रामीण भागात शेती व्यवसायात जे अभूतपूर्व यश संपादन केले आहे, त्यात साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विकास सोसायट्या, पतसंस्थांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात सहकारातही संगणक, इंटरनेट व मोबाईल या साधनांच्या अनुषंगाने अधुनिक तंत्रज्ञानाला अधिकची पसंती दिली जाते, याचे समाधान वाटते.

(शब्दांकन : कल्याण पाचांगणे, माळेगाव)