
एक हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट
माळेगाव, ता. ३१ : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेने मार्च २०२३ अखेर ९७६ कोटींवरून १ हजार कोटीपर्यंत संमिश्र व्यवसाय पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्थेचा बारामतीसह पुणे, मुंबईसह राज्यात ५२ शाखांचा विस्तार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली.
या पतसंस्थेच्या स्थापनेला रविवारी (ता. १ जानेवारी) ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. वर्धापनदिनाचे औचित्य साधून लेंभे यांनी बारामतीमध्ये ग्राहकांसह सभासदांशी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत शेटे, संचालक, अधिकारी, शाखाप्रमुख आदी उपस्थित होते.
लेंभे म्हणाले, ‘‘छत्रपती पतसंस्थेकडे ३१ डिसेंबर २०२२ अखेर ५४२ कोटींच्या ठेवी असून, कर्ज वाटप ४३३ कोटी ७६ लाख इतके केले आहे. संस्थेने १६३ कोटींची गुंतवणूक केली असून, खळते भांडवल ६६२ कोटींचे आहे. संस्था प्रशासनाचा संमिश्र व्यवसाय ९७६ कोटी ११ लाख रुपयांपर्यंत पोचला आहे. या संस्थेचे भागभांडवल २५ कोटी ६८ हजार १८९ इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड एवढे विस्तारित कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने बँकेप्रमाणेच सीबीएस प्रणाली राबविली आहे. स्वमालकीच्या डेटा सेंटरद्वारे सर्व शाखांमधून आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस सुविधा सुरू केल्या आहेत. संस्थेने स्वतःच्या मोबाईल ॲपमार्फत ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा, क्यूआर कोड व युपीआय कोड सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आर्थिक अडचणीतील १३ पतसंस्थांचे विलीनीकरण करून संबंधित ठेवीदारांना दिलासा दिला आहे. संस्थेची १०० कोटी सोनेतारण कर्ज व्यवहार, अल्पदरात सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा, एनपीएची पूर्ण तरतूद, स्टँडर्ड सीडी रेशो, सुरक्षित ठेवी, सुरक्षित गुंतवणूक, सुरक्षित कर्जे, सर्वांसाठी विमा योजना आदी वैशिष्ट्ये, ग्राहकसेवेचा दर्जा पाहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.’’