
माळेगावात महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप व्यक्त
माळेगाव, ता. १२ : जलसंपदा विभागाने नीरा-डावा कालव्याद्वारे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन शेती सिंचनासाठी सोडले आहे. मात्र, बारामती तालुक्यात माळेगावसह अनेक गावांमध्ये थकीत वीज बिल वसूलीसाठी महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचा धडाका लावला आहे. परिणामी पाण्याची उपलब्धता असूनही विजेअभावी शेती सिंचनासाठी खूपच मर्यादा आल्याने नियमित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमिवर रविराज तावरे आदी कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे वरील समस्येवर उपायोजना करण्याची मागणी महावितरण कंपनीकडे केली आहे. विशेषतः या समस्येवर वेळीच तोडगा न निघाल्यास महावितरण कंपनीला टाळे ठोकण्याचाही इशारा संबंधित कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामध्ये रविराज तावरे, रमेश गोफणे, सुभाष तावरे, जितेंद्र तावरे, दत्तात्रेय तावरे, भागवत पवार, हरिभाऊ जाधव, नामदेवराव तावरे, बाळू नाळे, अजित वाघमोडे, अमोल गोफणे, वैभव भोसले, दिलीप तावरे, काकासाहेब भोसले, महेश लोणकर,देवकाते, मदने आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.