
बारामतीत युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
माळेगाव, ता. १९ ः जळगाव कडेपठार (ता. बारामती) येथील पीरबाबा यात्रेतील वाहनतळामध्ये मोटारसायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत पाच जणांनी धारदार शस्त्राच्या साह्याने उमेश लक्ष्मण ताम्हाणे (वय ३३, रा. जळगाव कप) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रविवार (ता. १९) रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास यात्रेनिमित्त आयोजित केलेला तमाशा पाहून निघाल्यानंतर वरील घटना घडली.
याप्रकरणी जखमी ताम्हाणे यांच्यावर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांनी माळेगाव पोलिसांकडे पाच संशयित आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. वैद्यकीय अहवालाच्या आधारे तसेच उपलब्ध फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक किरण अवचार यांनी आरोपी बंडा काशीद, (रा. मेडद, ता. बारामती), इंद्रजित सोनवणे (रा. कऱ्हावागज, ता. बारामती), अक्षय घोलप (रा. मेडद) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.