
हिंदू-मुस्लिम एकोप्यासाठी इफ्तार माळेगाव येथे विविध पक्ष, संघटनांकडून आयोजन
माळेगाव, ता. २० : माळेगाव (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. शांततेतून समृद्धीकडे जायचे झाल्यास तसेच हिंदू-मुस्लिम समाज एकोप्याने राहावा, यासाठी हे आयोजन खूप महत्त्वाचे असल्याचे अशोक सस्ते यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. १८) शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्टीचे आयोजन केले होते. या वेळी पवार म्हणाल्या, ‘‘रमजानमधील उपवास म्हणजे चित्तशुद्धी व शरीरशुद्धी, मनशुद्धी. ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. या काळात उपवास करून दुसऱ्याच्या तहान-भुकेची जाणीव करून दिली जाते.’’ या माध्यमातून बंधुतेचा व समानतेचा संदेश देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम आदर्शवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे, दीपक तावरे, रणजित तावरे, जयदीप तावरे, शिवराज जाधवराव, ॲड. राहुल तावरे, अमर तावरे-लाखे, संजय भोसले, रमेश गोफणे आदी प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.
भाजप नेते व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक एकीचे दर्शन घडवित इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या वेळी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १९) मुस्लिम बंधू-भगिनींना इफ्तार पार्टीनिमित्त मोफत अन्नदान केले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे, रमेश गोफणे, प्रमोद जाधव, प्रताप सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.