पणदरे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

पणदरे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

माळेगाव, ता. ८ : पणदरे (ता. बारामती) ग्रामपंचतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह सत्ताधारी व विरोधकांचे आठ विरुद्ध आठ, असे संख्याबळ झाले. विकासकामे करताना अथवा धोरणात्मक निर्णय घेताना बहुमत महत्त्वाचे असते. येथे मात्र स्पष्ट बहुमत कोणाकडेच नसल्याने व सदस्यांच्या हेवेदावे वाढल्याने विकास कामे रखडली आहेत. नियमित देयके थकली आहेत. पाच महिन्यांपासून दैनंदिन कामकाज वगळता प्रशासनाकडून एकही ठोस काम झाले नसल्याची गावकऱ्यांची ओरड आहे.
बारामती तालुक्यात पणदरे गावाला राजकीय, सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्याचे पडसाद पाच महिन्यापूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. येथे सरपंचपदासह सत्ताधारी गटाचे आठ सदस्य आणि विरोधकांचे आठ सदस्य निवडून आले. सत्तासंघर्ष निवडणुकीपुरता मर्यादित न राहता तब्बल पाच महिने उलटले तरी गावच्या कारभारात दिसून येत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये अद्याप सुसूत्रता आली नाही.
परिणामी या ग्रामपंचायतीचा कारभार संबंधित पदाधिकाऱ्यांच्या वादाच्या कचाट्यात सापडला आहे. विकास कामे रखडली आहेत. नियमित देयके थकली आहेत. लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराचा गाडा कसा पुढे घेऊन जायचा, या विवंचनेत सरपंच अजय सोनवणे व उपसरपंच मनोज जगताप हे आहेत. एका बाजूला विरोधकांनी नियमानुसार काम झाले पाहिजे, कायदेशीर कामाला आमचा विरोध नसल्याचे कळविले आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांना कोणतेही काम पुढे आणले की त्याला बहुमत नसल्याने ते काम ग्रामविकास अधिकारी करत नसल्याचे माहिती पुढे आली आहे. सदस्यांच्या पाच मासिक बैठका आणि दोन ग्रामसभा झाल्या, परंतु एकही ठोस काम झाले नसल्याची गावकऱ्यांची ओरड आहे.


पणदरे गावाला स्वातंत्र्यसैनिकांचा वैभवशाली वारसा आहे. या वैभवशाली इतिहासाचे साथीदार म्हणजे पणदरे ग्रामपंचायतीची इमारत. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकसनशील विस्ताराबरोबर सांस्कृतिक, वैचारिक वातावरण निर्माण होण्याची काळाची गरज आहे. परंतु, अलीकडच्या काळात राजकारणापायी या गावाचे वैभव धोक्यात आल्याचे मला दिसून येते. ही समस्या वेळीच सोडविण्यासाठी पणदरे भागातील ज्येष्ठ मंडळींसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
- अजय सोनवणे, सरपंच, पणदरे

गावचे गावपण टिकविण्याची जबाबदारी पणदरे गावामधील सर्वच घटकांची आहे. लोकशाहीच्या आधारे लोकांनी बहुमताने आम्हाला निवडून दिले आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने आमचे विचार सत्ताधाऱ्यांना कधीच आड येणारे नाहीत. परंतु, कोणतेही काम नियमानुसार व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. अर्थात आम्ही सत्तेत असतानाही अशीच राजकीय स्थिती होती, तरीही सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही पणदरेकरांचा विकास केला.
- सत्यजित जगताप, विरोधी गटाचे प्रमुख सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com