राष्ट्रवादीतील भांडण भाजपच्या पथ्यावर

राष्ट्रवादीतील भांडण भाजपच्या पथ्यावर

माळेगाव, ता. १० : बारामती तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सांगवी, पणदरे, माळेगाव ही गावे मोठी आहेत. या गावांना राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. परंतु, सांगवी, पणदरे या गावात सत्तासंघर्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन गटात सध्या भांडण सुरू आहे. सांगवीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, युवराज तावरे यांचा मोठा गट कार्यरत आहे. असे असताना येथे राष्ट्रवादीमध्ये सरपंचपदावरून सुरू झालेली धुसफूस निश्चितच भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. तशीच काहीशी पोषक स्थिती पणदरेमध्ये भाजपला डोके वर काढण्यासाठी उपयोगी ठरू शकते, असे मत जाणकारांचे आहे.
बारामतीचा सर्वांगाने विकास होत असताना सांगवी, पणदरे आदी गावांचा चेहरा बदलत चालला आहे. हे आशादायक चित्र असताना आता या गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी विकास प्रक्रियेला घरघर लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
सांगवीमध्ये अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या विचाराचे सरपंच चंद्रकांत निवृत्ती तावरे हे कार्यरत झाले आहेत. त्यांचा २० महिन्यांचा कालावधी गावातील पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिला होता. तो संपून सहा महिन्याचा कालावधी उलटला असतानाही अद्याप राजीनामा झाला नाही. परिणामी सांगवीतील राष्ट्रवादीच्या गोटातच मोठी धुसफूस वाढली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम ग्रामपंचायत कारभारावर झाला आहे. येथील नागरी सुविधांमधील रेंगाळलेली कामे, कराची थकबाकी वाढली आहे, मंजूर झालेली ८ कोटी रुपयांची सुधारित पाणी पुरवठा योजना थांबली आहे. त्यामुळे तावरे यांच्या सरपंचपदाच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी प्रकाश तावरे, अनिल तावरे, किरण तावरे, महेश तावरे, विलास तावरे यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. परंतु, तसे न झाल्यास गावच्या कारभाराबरोबरच आगामी काळात माळेगाव कारखाना, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
सांगवीप्रमाणेच पणदरे गावामध्येही राष्ट्रवादीच्या विचाराचे दोन गट विविध मुद्यांवर आमनेसामने येत आहेत. त्याचा थेट परिणाम येथील दैनंदिन कामकाजाबरोबर विकास कामांवर झाला आहे.ही बाब निश्चितच लोकहिताची नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com