
बारामतीत मधमाशी पालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन
माळेगाव, ता.१९ः अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) जुलै २०१२ मध्ये मधमाशी पालन विभागाची स्थापना करीत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम सुरू ठेवले आहे. जगातून मधमाशी नष्ट झाली तर, मानव जात अडचणीत येऊ शकते, असे विधान थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी केले होते. त्याची दखल घेत अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार केव्हीकेने याकामी विविध उपक्रम राबविले आहे.
केव्हीकेने पुण्यासह विविध जिल्ह्यात डाळिंब, सूर्यफूल, शेवगा, कांदा बीज उत्पादन आदींसारख्या परागीभवन होणाऱ्या पिकांच्या उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले व प्रशिक्षण दिले. विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. मिलिंद जोशी म्हणाले,``केव्हीकेच्या मधमाशी पालन विभागामध्ये मधमाशीच्या विविध जाती, मधमाशी पालनासाठी लागणारे सर्व साहित्य उपकरणे उपलब्ध आहेत. सदर ठिकाणी शेतकऱ्यांना, महिलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणे दिली जातात. शेतकऱ्यांना विविध पिकात परपरागीभवनासाठी अॅपिस मेलीफेरा (विदेशी मधमाशी) व अॅपीस सेरेना इंडिका (सातेरी मधमाशी) या जातींच्या मधमाशीच्या पेट्या भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात पिकानुसार सुमारे ४० ते ६० टक्केपर्यंत वाढ झालेली दिसून आली आहे. या कामाची दखल घेत क्रॉप लाइफ इंडिया सारख्या नामांकित कंपनीने मधुसंदेश नावाचा पथदर्शी प्रकल्प आशिया खंडात प्रथम बारामती केव्हीकेला दिला.
प्रकल्पाअंतर्गत मधमाशी आणि इतर परागीभवन करणारे कीटक यांच्यावर विवध संशोधन केली जात आहेत. तसेच प्रशिक्षणे दिली जात आहेत. कृषी विज्ञान केंद्रामार्फत ज्या शेतकऱ्यांनी मधमाशी पेटीचा वापर करून स्वतःच्या शेतीमध्ये चांगले उत्पादन घेतले आहे, अशा शेतकऱ्यांचा सत्कार उत्कृष्ट शेतकरी म्हणून मधमाशी दिनाच्या दिवशी केला जातो.
- डॉ. मिलिंद जोशी, विशेषज्ञ