नीरा नदी प्रदूषणाबाबत कारवाई करणार

नीरा नदी प्रदूषणाबाबत कारवाई करणार

माळेगाव, ता. ५ : ‘‘नीरा नदी प्रदूषित आहे, हे प्रथमदर्शनी मिळालेल्या सरकारी अहवालानुसार सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा संयुक्तिक नदी पाणी तपासणी रिपोर्ट आल्यानंतर  दोषी व जबाबदार लोकांवर कारवाई ही होणारच आहे, हे होत असताना गाव पातळीवरील सांडपाण्याची व्यवस्था ही नदीमध्ये करू नये, हेही आपली जबाबदारी आहे,’’ अशा शब्दात केंद्रीय जलशक्ति खात्याचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी नदीकाठच्या गावकऱ्यांना आवाहन केले. 
नीरावागज येथे गावकऱ्यांशी संवाद करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संजय टंडन, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, दिलीप खैरे, युवराज तावरे, राजेंद्र देवकाते, जगदीश देवकाते, अभिजीत देवकाते, विठ्ठलराव देवकाते, बापूराव सोलंकर, मिथुन आटोळे, सरपंच भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री पटेल म्हणाले, ‘‘नीरा नदी दूषित झाल्याने लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. हा त्रास वर्षानुवर्ष सहन करणे आपल्याला कसे शक्य झाले. याबाबत माझ्या मनाला वेदना होतात. या पुढील काळात नीरा नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून, या परिसरामध्ये नदीचे पाणी स्वच्छ राहण्याची काळजी आम्ही घेऊ, परंतु हे दूषित पाणी निर्माण करणारे कत्तलखाने, आदी कारखान्यांनी सावध होण्याची गरज आहे. या पुढील काळात गावांमधील सांडपाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. निश्चितपणे यापुढील काळात नदी प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हे आश्वासन नसून कृतीमध्ये आणले जाणार काम केले जाईल.’’
राम शिंदे म्हणाले, ‘‘बारामती मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव राज्य सरकारने दिले, त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. परंतु, पवार कुटुंबियांनी या निर्णयाचे स्वागत करायला मनाचा मोठेपणा दाखवला नाही.’’
ज्ञानदेव बुरुंगले यांनी सूत्रसंचालन केले.

‘दौरे थांबणार नाहीत’
पणदरे येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती नव्हे, तर पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे दौरे सुरू आहेत, अर्थात दौरे करून आम्ही थांबणार नाही तर येथील समस्या सोडवणे, लोकांना आपलेसे करणे आणि या निवडणुकीमध्ये यश संपादन करणे, हा आमचा अजेंडा आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांना घाबरून आमचे दौरे थांबणार नाहीत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com