मांजरी खुर्दचे सरपंच ठरले अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरी खुर्दचे सरपंच ठरले अपात्र
मांजरी खुर्दचे सरपंच ठरले अपात्र

मांजरी खुर्दचे सरपंच ठरले अपात्र

sakal_logo
By

मांजरी खुर्द, ता. ५ : शासकीय जागेतील अतिक्रमणप्रकरणी मांजरी खुर्दचे (ता. हवेली) सरपंच निखिल उत्तम उंद्रे यांना अपात्र घोषित केले आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी त्याबाबचा आदेश दिला.
माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप ज्ञानोबा उंद्रे यांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत सदस्य निखिल उंद्रे यांच्या विरुद्ध शासकीय जागेतील अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मात्र, ही तक्रार मुदतीत निकाली न निघाल्याने तक्रारदार उंद्रे यांनी जानेवारी २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पुढील तीन आठवड्यात तक्रार निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार व जाब देणार यांना सुनावणीची संधी देऊन तक्रारदार उंद्रे यांचा अर्ज फेटाळला होता.
त्यामुळे त्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड यांनी तक्रारदार उंद्रे यांचे अपील मान्य करीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. तसेच, ग्रामपंचायत सदस्य निखिल उंद्रे यांना अपात्र घोषित केले.
या अगोदर पंधरा दिवसांपूर्वी निखिल उंद्रे यांना ग्रामपंचायत मासिक सभेमधील बेकायदेशीर व नियमबाह्य ठरावप्रकरणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या न्यायालयाने सरपंच व सदस्यपदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामविकास मंत्रालय न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यामुळे निखिल उंद्रे यांना दिलासा मिळाला होता. अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदासह सरपंचपदावरूनही पायउतार व्हावे लागणार आहे.