
पशुधनाचे मॉन्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे
मोरगाव, ता. १० ः बारामती तालुक्यात पशुधनाच्या संतुलित आरोग्यासाठी मॉन्सूनपूर्व लसीकरण सुरू असून प्रत्येक पुशपालकाने पशुधनाच्या आरोग्यासाठी हे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन बारामती पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांनी केले.
जनावरांची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी व कोणत्याही रोगापासून ती सुरक्षित राहण्यासाठी हंगामाप्रमाणे नियमित लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात शंभर टक्के शेतकऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी जागृती नसल्यामुळे ते लसीकरणासाठी फारसे उत्सुक नसतात. बारामती तालुक्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय केंद्राच्याअंतर्गत मोफत लसीकरण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसीकरणासाठी योग्य तो प्रतिसाद देणे गरजेचे आहे. गाय, म्हैस या मोठ्या जनावरांसाठी घटसर्पावरील चौदा हजार पाचशे लसीकरण, फऱ्यावरील अकराशे लसीकरण, शेळ्या मेंढ्यांवर आढळणाऱ्या आंत्रविषारवर तेरा हजार पाचशे लसीकरण, कोंबड्यामध्ये आढळणाऱ्या मानमोडीवर सोळा हजार लसीकरण तर देवी वर सतरा हजार लसीकरण, मोठ्या जनावरांमध्ये ब्रुसेलोसिसवर सव्वीस हजार तीनशे लसीकरण असे उदिष्ट असून ते शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन तालुकास्तरावरून केले आहे.
बारामती तालुक्यातील दुभत्या जनावरांसाठी न्युट्रीफीड आणि शुगरगेजचे उपलब्ध झालेले बियाणे यांचेही वाटप करण्यात आले असून शेतकऱ्यांनी जनावरे सुदृढ राहण्यासाठी सकस चाऱ्यावर भर देण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. सध्या प्रत्येक पशुधन विकास केंद्राच्या कार्यक्षेत्रात पशुपालकांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, वेळेत लसीकरण पूर्ण करण्यासाठी व कोणतीही जनावरे लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी पशुपालकांनी पशुधन केंद्राशी संपर्क करावा. बारामती तालुक्यात चोवीस ठिकाणी पशुधन विकास केंद्र असून गावासह वाड्यावस्त्यावरील शेतकऱ्यांनी पशुधनविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून मॉन्सूनपूर्व लसीकरण वेळेत पूर्ण करून घ्यावे असे आवाहन बारामती पंचायत समितीकडून करण्यात आले आहे. मोरगाव पशुधन विकास केंद्राच्या अंतर्गत असलेल्या पन्नास टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. औदुंबर गावडे यांनी दिली.
Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00506 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..