तरडोलीच्या सरपंचपदी विद्या भापकर कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरडोलीच्या सरपंचपदी विद्या भापकर कायम
तरडोलीच्या सरपंचपदी विद्या भापकर कायम

तरडोलीच्या सरपंचपदी विद्या भापकर कायम

sakal_logo
By

मोरगाव, ता. १ : तरडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची ९ व १० डिसेंबर २०२१ रोजी झालेली निवडणूक प्रक्रिया कायदेशीर झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनीही कायम केल्यामुळे विद्या भापकर यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे.

तरडोली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी विद्या भापकर व नवनाथ जगदाळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. भापकर गटाकडे पाच मतांचे बहुमत असूनही दोन मते निवडप्रक्रियेत बाद ठरविल्यामुळे चार मतांचे अल्पमत असलेल्या जगदाळे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली होती, मात्र ही निवडणूक प्रक्रिया चुकीची झाल्याचा दावा करत जिल्हाधिकारी यांच्याकडे विद्या भापकर यांनी अपील केले होते. निवड प्रक्रियेतील वस्तुस्थिती पाहून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जगदाळे यांची सरपंचपदी झालेली निवड रद्द करत सरपंच निवडणूक परत घेण्याचा आदेश दिला.

त्यानुसार ९ डिसेंबर २०२१ रोजी सरपंचपदाची निवडणूक घेतली. दरम्यान, राजकीय घडामोडींमुळे भापकर गट अल्पमतात, तर जगदाळे गट बहुमतात गेला, परंतु सरपंच निवडणुकीसाठी विद्या भापकर यांचा एकमेव अर्ज दिलेल्या वेळेत दाखल झाला. यावेळी भापकर यांच्यासह स्वाती गायकवाड, संतोष चौधरी, नबाबाई धायगुडे हे चार सदस्य उपस्थित होते, तर इतर पाच सदस्य गैरहजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी धनसिंग कोरपड यांनी अर्ज घेणे, छाननी, माघार या प्रक्रिया नियमानुसार केल्या. त्यात भापकर यांचा एकमेव अर्ज होता. यावेळी सरपंच निवडीच्या सभेसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण नसल्यामुळे नियमानुसार सभा तहकूब केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य उपस्थित होते. मात्र कोरपड यांनी नियमानुसार सभा तहकूब झालेल्या वेळेपासून पुढे सभेचे कामकाज सुरू केले आणि तहकूब सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता नसल्याने भापकर यांना सरपंच म्हणून घोषित केले, पण ही निवडप्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली असून, सरपंच निवड मान्य नसल्याचा दावा करत उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जगदाळे, सागर जाधव, अश्विनी गाडे, अनिता पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती पाहून अर्जदारांचा अर्ज फेटाळत निवडणूक प्रक्रिया कायदेशीरपणे झाल्याचे स्पष्ट केल्याने भापकर यांचे सरपंचपद अबाधित राहिले, मात्र उपसरपंच महेंद्र तांबे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. डॉ. रामोड यांनी दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती पाहून तांबे यांचे अपील फेटाळत जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम केला. भापकर यांच्या बाजूने ॲड. हेमंत भांड -पाटील यांनी युक्तिवाद केला.
------------------
गावातील विकासकामांना वेग
पंचवार्षिक निवडणुकीनंतर येथील ग्रामपंचायतीमध्ये एकीकडे अखंडपणे तक्रारी, कोर्ट कचेरी सुरू आहे, मात्र दुसरीकडे गावाच्या विकासावर कोणताही परिणाम न होता लाखो रुपयांच्या निधीची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे येथील राजकारणाची पंचक्रोशीत चर्चा आहे.
----------------------