
मुर्टीत तरुणांकडून वृक्ष संवर्धनाची चळवळ
मोरगाव, ता. १३ : मुर्टी (ता. बारामती) येथे अनेक वर्षांपासून तरुणांकडून वाढदिवसावरील अतिरिक्त खर्च टाळून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जात आहे. केवळ रोपांचे रोपण न करता युवकांकडून त्यांचे संवर्धन करण्यासाठी चळवळ उभारली आहे. त्यासाठी तरुणांकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्याचे पंचक्रोशीत कौतुक केले जाते.
ओढ्याच्या दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, सार्वजनिक ठिकाणी मुर्टी ग्रामपंचायत अंतर्गत साधारणतः दोन हजारांपेक्षा जास्त झाडे वाढदिवसाचे औचित्य साधून मुर्टीकरांनी लावली आहेत. वृक्षारोपण करताना झाडांची निवड करताना जमिनीतील ओलाव्यावर तग धरू शकतील व कमी पाण्यावरत रोपे चांगल्या पद्धतीने येतील. शिवाय भविष्य काळामध्ये या झाडांपासून सावलीसह निर्माण होईल, पद्धतीचे नियोजन येथील युवकांकडून केले जात आहे. येथील गणेश जगदाळे व रमेश बालगुडे हे दोघे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी झाडे जगवण्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी विना मोबदला टँकर उपलब्ध करून देत आहेत.
बारामती तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनीही मुर्टीमध्ये भेट देऊन युवकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. शिवाय अजून सार्वजनिक ठिकाणी चांगल्या पद्धतीने भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून कोणती देशी रोपे लावायची याविषयी मार्गदर्शन केले. मुर्टी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात चिंचेची लावलेली झाडे सध्या बहरात असून, त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे याशिवाय सकाळ माध्यम समूहाकडून ओढा खोलीकरण झालेल्या ठिकाणी बांबूची लागवड केली आहे. याशिवाय गरज असलेल्या ठिकाणी झाडांच्या संवर्धनासाठी संरक्षक जाळी बसवण्याचे कामही मुर्टीमध्ये होत आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरिदास जगदाळे, अमोल भोसले, गणेश जगदाळे, रमेश बालगुडे, शरद भगत, अमोल जगदाळे, ग्रामपंचायती, युवक तसेच ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याची माहिती उपसरपंच किरण जगदाळे यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी जपत आपल्या जन्मभूमीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेमधून मुर्टीमध्ये वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जलसंधारणाची कामे असे विविध उपक्रम युवकांना बरोबर घेऊन करण्याचा मानस आहे.
- किरण जगदाळे, उपसरपंच, मुर्टी
01331