मोरगाव योजना थकबाकीमुळे अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरगाव योजना थकबाकीमुळे अडचणीत
मोरगाव योजना थकबाकीमुळे अडचणीत

मोरगाव योजना थकबाकीमुळे अडचणीत

sakal_logo
By

मोरगाव, ता. ५ : येथील मोरगाव प्रादेशिक योजना थकबाकीमुळे अडचणीत आली असून, योजनेचा पाणीपुरवठा बंद करूनही सहा गावे वगळता इतर कोणत्याही गावातून पाणीपट्टी भरण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. संबंधित ग्रामपंचायतींनी थकबाकी भरण्यासाठी पाणीपट्टी वसूल करून प्रतिसाद द्यावा, असे आव्हान बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी केले आहे.

वास्तविक, जिल्हा परिषदेने देखभाल दुरुस्तीच्या जबाबदारी वरून मुक्त होत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर टेंडर पद्धतीने पाणीपट्टी वसूल करा आणि योजना चालवा या संकल्पनेनुसार चालवायला दिली. मात्र पूर्वीची अडीच तीन कोटींची थकबाकी असतानाही नव्या संकल्पनेनुसार योजना चालवूनही योजनेतील १५ गावांची गेली वर्षभराची पाणीपट्टी जवळपास ७० लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे.
मोरगाव योजनेतून आंबी खुर्द, आंबी बुद्रुक, भोंडवेवाडी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी लोणी, लोणी भापकर, काऱ्हाटी, जळगाव कप, जळगाव सुपे, भिलारवाडी, अंजनगाव, कऱ्हावागज या गावांना पाणीपुरवठा चालू होता.

एक मे पासून पाणीपुरवठा बंद केल्यानंतर थकबाकी असणाऱ्या मोरगाव, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, माळवाडी लोणी, तरडोली या सहा गावांनी काही रक्कम भरून पाणीपुरवठा सुरळीत करून घेतला मात्र अद्याप नऊ गावांनी मात्र पाणीपट्टी भरण्यासाठी कोणताच प्रतिसाद दिला नाही.

थकबाकी असणाऱ्यांचे नळजोड बंद करून त्यांचा पाणीपुरवठा बंद करावा व नियमित पाणीपट्टी भरणारांना ग्रामपंचायतीने पाणी उपलब्ध करून द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.


पाणीही प्रत्येक नागरिकाची मुख्य गरज आहे. नागरिकांनी पाणीपट्टी नियमित भरणे गरजेचे आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य ,ग्रामसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी यांनी योग्य पद्धतीने पाणीपट्टी वसुली मोहीम राबवून योजनेची थकीत पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.
- डॉ. अनिल बागल, गटविकास अधिकारी, बारामती


समन्वयक बैठकीत दिल्या सूचना
आठ दिवसात मोरगाव योजनेच्या गावांची एकत्रित समन्वय बैठक घेऊन थकित पाणीपट्टी भरण्याच्या सक्त लेखी सूचना देण्यात येणार आहेत. तोपर्यंत संबंधित योजना चालवणाऱ्या यंत्रणेने योजनेचे पाणी पाणीपट्टी भरणाऱ्या गावांना उपलब्ध करून द्यावे अशा सूचना डॉ. बागल यांनी दिल्या आहेत. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे याशिवाय खाजगी विहिरीत नाही पिण्यायोग्य पाणी नसल्यामुळे योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.