
मानाचा विड्याला ८१ लाख, तर,ओटीला ३३ लाख ५५ हजारांची बोली
मोशी, ता. २० : ८१ लाख एक वार, दोन वार, तीन वार..आणि हा मानाचा विड्याचा लिलाव घेतला आहे, अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी..असा खर्जातील आवाज घुमला ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलावाप्रसंगी! विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
या विड्यातून महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना बारणे बंधूंनी व्यक्त केली. मानाची ओटी भालचंद्र बोराटे यांनी ३३ लाख ५५हजार ५५५ रुपये, मानाचे पहिले लिंबू १३ लाख २५ हजार रुपयांना उद्योजक अतिश बारणे, अक्षय बारणे, दुसरे लिंबू राजू बोराटे यांनी ७ लाख ५१ हजारांना, तर शेवटचे मानाचे लिंबू १७ लाख रुपयांना नीरज सस्ते यांनी बोली लावून घेतले.
दीडशे वर्षांहून अधिक काळ ही परंपरा व भंडारा उत्सव आजही सुरू आहे. रविवारी (ता.१९) झालेल्या उत्सवात एक लाखांहून अधिक भाविकांनी बुंदी व शाकभाजीचा महाप्रसाद घेतला. याच उत्सवात महाराजांना अर्पण केलेल्या मानाची ओटी, विडा, लिंबू आदी वस्तूंसह ग्रामस्थ महाराजांना सोन्या-चांदीचे दागिने, शेतातील फळे, भांडी, भाजीपाला यासह विविध वस्तू अर्पण करतात.
--
- मानाचा विडा, मानाची ओटी व मानाचे लिंबू आदी वस्तूंच्या लिलावाला सोमवारी (ता.२०) सकाळी दहाला सुरुवात झाली. पिढ्यान् पिढ्या बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी आणि निखिल केदारी यांनी केले. त्यांनी आपल्या खर्जातील आवाजात एक-एक वस्तूंची बोली लावली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त व मोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- विविध वस्तूंच्या लिलावातून एकूण दीड कोटींहून अधिक रक्कम देवस्थान ट्रस्टकडे जमा होणार आहे. याचा विनियोग देवस्थानच्या प्रगतीसाठी केला जाईल, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.