
आंबेगाव तालुक्यात आवर्तनाची मागणी
महाळुंगे पडवळ, ता. २ : हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डावा कालवा पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे डाव्या कालव्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील आमोंडी, कोलदरा, गोनवडी, चिंचोली, गिरवली, चास, कडेवाडी, महाळुंगे पडवळ, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, कळंब व जुन्नर तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांना डावा कालवा वरदान ठरलेला आहे. पावसाळा संपल्यानंतर कालव्याला पाणी सोडले नाही. त्यामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रातील छोटे बंधारे, विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी घटली आहे. कळंब येथील शिलमळा, बागमळा, शिंदेमळा, दगडीमळा येथील बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या अर्धा ते एक तासही मोटर चालणे मुश्कील झाले आहे. जनावरांच्या चारा पिकांची अवस्था खूपच वाईट झाली असून पिके जळण्याच्या मार्गावर आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे.
कुकडी पाटबंधारे विभागाने त्वरित नियोजन करून पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर यांनी केली.