बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात 
दोन शेतकरी जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १८ : कृषी पंपाची मोटर सुरू करून दुचाकीवर घरी चाललेल्या दोन शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे बुधवार (ता. १७) रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली. बन्सी महादू टेमगिरे व संदीप बाळशीराम मावकर (दोघेही रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव), असे जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
मावकर आणि टेमगिरे हे दोघेजण रात्री उसाला पाणी भरायचे असल्याने नदीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले होते. साडेबाराच्या दरम्यान ते मोटर चालू करून दुचाकीवरून चांडोली-लौकी रस्त्याने घरी जात असताना पाझरघाटमळा येथे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने संदीप मावकर व बन्सी टेमगिरे यांच्या पायाच्या खाली पंजा मारला.
दरम्यान, हल्ला होताच दुचाकी चालक टेमगिरे यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी पुढे पळवली. पुढे जाऊन ४०० मीटर अंतरावर गाडी थांबवून मागे पाहिले असता बिबट्या काही वेळ रस्त्यावरच उभा होता. त्यानंतर घरी जाऊन त्यांनी प्राथमिक उपचार केले व दुसऱ्या दिवशी मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. या घटनेची माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या आदेशाने वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक प्रदीप औटी यांनी रुग्णालयात येऊन त्यांची विचारपूस करत घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यातील ही पाचवी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ठिकाणी तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

त्वरित बंदोबस्त करा
कळंब, लौकी चांडोली बुद्रुक परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर आहे. परिसरातील नागरिकांना दिवसही बिबट्याचे दर्शन होत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून वारंवार बिबटे माणसांवर हल्ले करत आहेत. परंतु, बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला अपयश आले आहे. वन विभागाने त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात यांनी केली आहे