
कळंब येथे दोघांवर बिबट्याचा हल्ला
महाळुंगे पडवळ, ता. ६ : कळंब (ता. आंबेगाव) येथील लौकी रस्त्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील दोन शेतकरी जखमी झाले. मंगळवारी (ता. ६) रात्री पावणेनऊ वाजता हा घटना घडली.
लौकी (ता. आंबेगाव) येथील हरिभाऊ वाघ आणि मंगेश थोरात हे दोघे शेतकरी आठवडे बाजार करून दुचाकीने घरी चालले होते. त्यावेळी मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता मारुती थोरात यांच्या कळंब-सुंभेमळावस्तीच्या अलीकडे मक्याच्या शेतात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी हरिभाऊ यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी वेगाने तशीच पुढे नेली. दुचाकीच्या आवाजामुळे बिबट्याने धूम ठोकली. सुदैवाने केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते बिबट्याच्या तावडीतून बचावले. मात्र, मंगेश यांच्या डाव्या हाताला खोलवर जखम आहे. आणि पायाला बिबट्याच्या पंजाच्या ओरखडल्याच्या जखमा आहेत. डाव्या हाताला तीन दात ओरखडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच, हरिभाऊ वाघ यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. कळंब येथील डॉ. बाळकृष्ण थोरात यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले.