Pune : दिवाळीत फूल उत्पादकांचे चेहरे कोमेजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer
दिवाळीत फूल उत्पादकांचे चेहरे कोमेजली

Pune : दिवाळीत फूल उत्पादकांचे चेहरे कोमेजली

माळशिरस : सततच्या पावसामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भिजलेली शेवंती फुले पुणे येथील फूल बाजारात अंत्यत कमी वीस, तीस रुपये किलो एवढ्या कमी किमतीमध्ये विकली जात आहे. ऐन दिवाळीमध्ये मागणी अभावी तशीच पडून असल्याने फूल उत्पादकांचा दिवाळी हंगाम वाया गेला आहे.

यावर्षी दसऱ्यामध्ये शेवंती वर्गीय फुलांना दोनशे ते अडीचशे रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळाला. यामुळे दिवाळीमध्ये देखील फुलांना चांगल्या प्रकारचे असेच बाजार भाव मिळतील अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, मागील आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर दररोज पाऊस कोसळत आहे. यामुळे फुलांचे अत्यंत नुकसान झाले आहे. पावसामुळे फुले काळी पडली आहे, अशी फुले विक्रीसाठी आणल्यावर खराब होत असल्याने बाजारात या फुलांना मागणी नाही.

पुणे येथील फूल बाजारात नेहमी प्रमाणे यावर्षी देखील बाहेरील जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर फुले खरेदी करण्यासाठी व्यापारी बाजारात आलेले आहेत. मात्र अशा प्रकारे पावसाने भिजलेली फुले खरेदी करून बाहेर पाठवायचे झाल्यास जाईपर्यंत ती खराब होत आहेत.

गुलटेकडी फूल बाजारात भिजलेली कापरी, झेंडू, बिजली वीस तीस रुपये दराने विकली गेली. शेवंतीची फुले देखील वीस तीस रुपये किलो दराने विकली गेली. ओली नसलेली शेवंतीची फुले शंभर ते सव्वाशे रुपये किलोपर्यंत विकली जात असताना पावसामुळे भिजलेली फुले अशा नाममात्र दराने विकावी लागत असल्याने फूल उत्पादक पोपट वाघले, जर्नादन वाघले, रामदास वाघले, तुळशीराम वाघले, श्‍यामराव वाघले या शेतकऱ्यांनी फुलांवर वर्षभरातील आखलेली शेतीचे बजेट पूर्णतः कोलमडले असून, शासनाने फूल उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे.

वर्षी फुलांच्या लागवडी कमी असल्याने दिवाळीच्या हंगामात पाऊस नसता तर शेवंती दोनशे रुपये किलोपर्यंत सहज विकली गेली असते. उत्पादक व त्या संबंधित सर्व घटकांचे यामुळे नुकसान झाले आहे.
-मोहन कुंजीर, फूल आडतदार