
माळशिरस सोसायटीच्या तेरा जागांसाठी ६१ अर्ज
माळशिरस, ता. १२ : माळशिरस (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा जागांसाठी एकूण ६१ उमेदवारांची उमेदवारी अर्ज आले आहेत. सोमवारी (ता. १३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने अंतिम उमेदवार कोण असणार की ऐनवेळी निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट होणार आहे,
या सोसायटीच्या सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी सरपंच अरुण यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनेलमधून तेरा जागांसाठी 36 उमेदवारी अर्ज आलेले आहेत, तर मागील वेळी अरुण यादव यांच्याबरोबर असलेले मात्र सध्या त्यांच्याबरोबर फारकत घेऊन विरोधात गेलेले युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माउली यादव, सरपंच महादेव बोरावके, माजी सरपंच एकनाथतात्या यादव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तेरा जागांसाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सोसायटी निवडणुकीत ग्रामपंचायतीचे गणित
माळशिरस ग्रामपंचायतीचा कार्यकाल पुढील दोन महिन्यांत पूर्ण होत असून, त्यानंतर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार असल्याने व मागीलप्रमाणेच येथे सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने ग्रामपंचायतीची सेमी फायनल म्हणून सोसायटी निवडणुकीकडे पाहिले जात आहे. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता इच्छुक मंडळी या निवडणुकीत मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत.