
उन्हाळी आवर्तनानंतरही कुकडीत १२ टक्के पाणी
नारायणगाव, ता. ५ : कुकडी प्रकल्पातील धरणांतून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन पूर्ण झाले आहे. प्रकल्पात आजअखेर ३.५९९ टीएमसी (१२.१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. काटेकोर नियोजन केल्यामुळे पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा वापर न करता व पिण्यासाठी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक ठेवून उन्हाळी आवर्तन पूर्ण करण्यात यश आले.
कुकडी प्रकल्पात येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, डिंभे या प्रमुख पाच धरंणाचा समावेश होतो. या धरणांना जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यांतील शेती सिंचनासाठी ६२३ किलोमीटर लांबीचे कालवे आहेत. त्यापैकी जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या पाच तालुक्यांना जोडणारा सर्वाधिक २४९ किलोमीटर लांबीचा कुकडी डावा कालवा आहे.
कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी माहिती दिली की, या प्रकल्पातून मार्च महिन्यात उन्हाळी आवर्तनाला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात डिंभे उजवा, घोड शाखा कालव्यात पाणी सोडले. त्यानंतर १७ मार्च २०२२ रोजी येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन १९ एप्रिल २०२२ रोजी बंद केले. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर मीना, कुकडी व घोड नदीवरील सत्तर कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी सोडले. सद्यःस्थितीत डिंभे डावा कालव्याद्वारे येडगाव धरणात व मीना शाखा कालव्यात पाणी सोडले आहे. पुढील तीन दिवसांत मीना शाखा कालव्याचे आवर्तन बंद करण्यात येणार आहे. या वर्षी प्रथमच पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्याचा वापर न करता माणिकडोह धरणात ०.८८ टीएमसी, वडज धरणात ०.२०१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा पिण्यासाठी शिल्लक ठेवून उन्हाळी आवर्तन पूर्ण करण्यात यश आले.
कुकडी प्रकल्पातील सत्तर बंधाऱ्यांत पाणी सोडले आहे. तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवन वेग वाढला आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा शेतीसाठी बेसुमार उपसा न केल्यास मेअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी टंचाई निर्माण होणार नाही. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाचे नियोजन करावे.
- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता,
कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१
धरणनिहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : ०.३४० (१७.५२), माणिकडोह : ०.८८९ (८.७३), वडज : ०.२०१ (२०.५५), डिंभे : २.०३८ (१६.३२), पिंपळगाव जोगे : ०.०८९ (२.३१).
Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01252 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..