जुन्नरला दोन लाख सीडबॉल निर्मितीचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला दोन लाख सीडबॉल निर्मितीचा उपक्रम
जुन्नरला दोन लाख सीडबॉल निर्मितीचा उपक्रम

जुन्नरला दोन लाख सीडबॉल निर्मितीचा उपक्रम

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ७ : पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेल्या जुन्नरमध्ये पंचायत समिती, महसूल, कृषी व वन विभागाच्या मदतीने सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास पुणे येथील आश्वास संस्थेने घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशी वृक्षांच्या बियांचे दोन लाख सीडबॉल जून महिन्यात तालुक्यातील गायरान व माळरान जमिनीत टाकण्यात येणार आहेत.
या उपक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी नुकतीच तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, आश्वास संस्थेचे संस्थापक अभिषेक रमेश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी विस्तार अधिकारी ए. के. खांडेकर, ‘मनरेगा’चे सहायक कार्यक्रम अधिकारी दुर्गेश गायकवाड, विस्तार अधिकारी, वृषाली साबळे, तालुका अभियान व्‍यवस्‍थापक उषा अभंग, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, ‘आश्वास’चे प्रतिनिधी प्रणिता फुलसुंदर, ओंकार वाळुंज, आर्या बेनके आदी उपस्थित होते.

सीडबॉल तयार करण्याची पद्धत
माती, शेण खत, पाणी याचे योग्य मिश्रण तयार करून लिंबाच्या आकाराचे सीडबॉल तयार करण्यात येतील. एका सीडबॉलमध्ये पिंपळ, बाभूळ, चिंच, उंबर, कडू लिंब आदी देशी झाडाच्या दोन ते तीन बिया असतील.

असा आहे उपक्रम
सीडबॉल बनवण्याकरिता केंद्रप्रमुख परिसरातून देशी वाणाच्या आवश्यक बिया गोळा करतील. सीडबॉल टाकण्याची ठिकाणे निश्चित करतील. सीडबॉल तयार करण्यासाठी गावांमधून मातीदेखील गोळा करतील. पंचायत समिती, कृषी, महसूल, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी, आश्वासचे स्वयंसेवक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी पंचायत समितीच्या आवारात सीडबॉल तयार करतील. शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, महिला बचत गटातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने १४ जून रोजी तालुक्यातील १७३ गावांतील गायरान, शासकीय पडीक जमीन, ओढा, नाला, नदी किनारी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीडबॉलचे रोपण करतील.

कमी खर्चाचा उपक्रम
पारंपरिक पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यात रोपे तयार करून पावसाळ्यात खड्डे घेऊन पुन्हा रोपांची लागवड करणे खर्चिक व श्रमाचे आहे. त्यातुलनेत सीडबॉलचे रोपण करणे कमी खर्चिक असून, त्यामध्ये झाडे जगण्याचे प्रमाण ५५ टक्के आहे. हा प्रयोग मागील वर्षी पुणे शहरातील सत्तावीस महाविद्यालयात राबवून साठ हजार सीडबॉल तयार करण्यात आले होते.

ऋतूमान व हवामान बदलाचा परिणाम जीवसृष्टीवर झाला आहे. तापमान वाढीचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. या मागे वृक्षतोड हे एक प्रमुख कारण आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासंदर्भात वेळीच शाश्वत उपाययोजना न केल्यास ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करण्याची व भविष्य काळात सजीवसृष्टी धोक्यात येण्याची शक्यता आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासंदर्भात प्रत्येक व्यक्तीने योगदान देण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षणाच्या भावनेतून आश्वास संस्थेने मागील दोन वर्षांपासून सीडबॉलच्या माध्यमातून काम सुरू केला आहे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन मोहिमेत ऑस्ट्रेलिया, केनियात सीडबॉलला प्राधान्य दिले जात आहे. ऑस्ट्रेलियात ड्रोनद्वारे सीडबॉलला जमिनीत टाकले जात आहेत.
- अभिषेक कोल्हे, संस्थापक, आश्वास संस्था

पर्यावरण संवर्धनासाठी सीडबॉलचा उपक्रम स्तुत्य आहे. शासकीय निधिविना सेवाभावी वृत्तीने हा उपक्रम जुन्नर पंचायत समिती, महसूल, कृषी, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत यांची मदत घेऊन तालुक्यातील राबविण्यात येणार आहे.
- शरदचंद्र माळी, गटविकास अधिकारी, जुन्नर

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01256 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top