बारा तासांनी मिरवणुकीची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारा तासांनी मिरवणुकीची सांगता
बारा तासांनी मिरवणुकीची सांगता

बारा तासांनी मिरवणुकीची सांगता

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १० : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत, ढोल, ताशा, झांज पथकासह विद्युत रोषणाई करून फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढून नारायणगाव या मुख्य शहरासह परिसरातील एकोणीस गावांतील सुमारे शंभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या व घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन मीना व कुकडी नदी पत्रात करून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. नारायणगाव येथील विरोबा व विक्रांत या गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सर्वात शेवटी आज पहाटे दीड वाजता मीना नदी पत्रात विसर्जन करून गणेश उत्सवाची सांगता झाली. नारायणगाव शहरातील विसर्जन मिरवणूक सुमारे बारा तास चालली.
नारायणगाव, येडगाव, मांजरवाडी, निमगावसावा, वारूळवाडी, गुंजाळवाडी, बोरी, कांदळी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव व परिसरातील घरगुती व बाल गणेश मंडळ, गृहनिर्माण सोसायटीतील गणेशमूर्तीचे विसर्जन शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आले. नारायणगाव ग्रामपंचायतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी अकरा स्वयंसेवकांची नेमणूक व विसर्जनाची खास व्यवस्था केली होती. बसस्थानकापासून सकाळी अकरा वाजता सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात खोदड रोड येथील आदर्श, औदुंबर, स्वराज्य, औदुंबर, संत सावतामाळी, मुंजोबा, प्रियदर्शनी, मुक्ताबाई आदी वीस मंडळांच्या गणेशाचे विसर्जन सायंकाळी सहा ते आठ वाजण्याच्या सुमारास झाले.
दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहानंतर नारायणगाव, वारूळवाडी येथील प्रगती, विरोबा, विक्रांत श्रीराम, नवशक्ती, कुलस्वामी, मुक्ताई मंडळ भाजीबाजार, हनुमान आदि गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. दुपारी पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळी सहानंतर मिरवणुका पाहण्यासाठी बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची गर्दी झाली होती. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत कक्ष उभारला होता. सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार यांच्या हस्ते गणेश मंडळाचा सत्कार करण्यात आला. प्रदूषण टाळण्यासाठी ग्रामपंचायत व रोटरी क्लबच्या वतीने निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01438 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..