नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस
नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस

नारायणगाव परिसरात मुसळधार पाऊस

sakal_logo
By

द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर; नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

नारायणगाव, ता. १२ : नारायणगाव परिसरात आज दुपारी सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला.
या मुसळधार पावसाचा फटका माल छाटणी झालेल्या द्राक्ष बागांना बसणार आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यात यावर्षी १ जुलैपासून पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. मागील तीन महिन्यांत तालुक्यात सरासरी १,१०० मिलिमीटर उच्चांकी पाऊस झाल्याने यामुळे ऊस पिकाचा अपवाद वगळता खरीप हंगामातील सोयाबीन या प्रमुख पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

कांदा पिकाला भाव न मिळाल्याने भाववाढ होईल, या अपेक्षेने साठवून ठेवलेला सत्तर टक्के कांदा चाळीतच सडून गेला आहे. पिकांच्या सततच्या नुकसानीमुळे एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रांत द्राक्ष बागा आहेत. सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची माल छाटणी सुरू केली आहे. साठ-सत्तर टक्के बागांची माल छाटणीची कामे पूर्ण झाली आहेत. छाटणी झालेल्या बागा घड निघण्याच्या व पिंगा अवस्थेत आहेत. मात्र, या वर्षी सततच्या पावसाने द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे.

मात्र धोका पत्करून द्राक्ष उत्पादक बागेची मशागत करत आहेत. द्रवरूप खते, औषधे, मजुरी यासाठी रोज खर्च करावा लागत आहे. द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाने तालुका कृषी अधिकारी, महसुल विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही ,अशी माहिती तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.
--------------