शेतकऱ्यावर ‘असमानी’नंतर चोरीचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यावर ‘असमानी’नंतर चोरीचे संकट
शेतकऱ्यावर ‘असमानी’नंतर चोरीचे संकट

शेतकऱ्यावर ‘असमानी’नंतर चोरीचे संकट

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १५ : अनेक संकटाचा सामना करत मळणी करून काढलेले एक टन सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले. चोरीची ही घटना शनिवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास खोडद (ता. जुन्नर) येथे घडली. या प्रकरणी शेतकरी प्रवीण विलास पानमंद यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पानमंद यांची खोडद येथील गारमळा शिवारात शेती आहे. सात एकर क्षेत्रात त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. सततच्या पावसामुळे सोयाबीनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस, मजूर टंचाई, रासायनिक खते, कीटकनाशकांचे वाढलेले भाव, बिबट्यांची भीती आदी एक न अनेक संकटाचा सामना करत उत्पादित केलेले सोयाबीन पीक काढण्यास पानमंद यांनी शुक्रवारी (ता. १४) सुरवात केली. दिवसभरात दीड एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकाची मळणी करून सुमारे दीड टन सोयाबीन तयार झाले. पावसाचा धोका विचारात घेऊन सोयाबीनच्या गोणी शेतावरील घरात ठेवल्या. शेतावर बिबट्यांची भीती असल्याने घराच्या दरवाजाला दोन कुलपे लावून ते रात्री गावातील घरी झोपण्यास गेले. मात्र, शनिवारी सकाळी शेतातील शिल्लक सोयाबीन काढण्यासाठी शेतात आले असता घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे एक टन सोयाबीन चोरून नेल्याचे दिसून आले. याबाबतची तक्रार त्यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. चोरीच्या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

न्याय देण्याची मागणी
नैसर्गिक अनेक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या परिस्थितीत काही प्रमाणात वाचलेले सोयाबीन पीक काढल्यानंतर बाजारपेठेत विक्रीसाठी तयार झालेले सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले. त्यामुळे चार महिने केलेले कष्ट व भांडवली खर्च वाया गेल्याने प्रवीण पानमंद चिंतेत आहे. चोरट्यांचा तपास लावून कष्टकरी शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी भावना पानमंद यांनी व्यक्त केली आहे.