एड्स जनजागृतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एड्स जनजागृतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : गायकवाड
एड्स जनजागृतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : गायकवाड

एड्स जनजागृतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : गायकवाड

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ५ : ‘‘एड्स या आजाराविषयी समाजात आजही समज व गैरसमज आहेत. त्याविषयी जागृती करण्याची गरज आहे. महाविद्यालयीन तरुणांनी पुढाकार घेऊन प्रबोधनाच्या माध्यमातून ही जागृती करावी.’’ असे आवाहन नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शर्मिला गायकवाड यांनी व्यक्त केले.
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रोटरी क्लब नारायणगाव हायवे, आयसीटीसी विभाग, नारायणगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने जनजागृती रॅली, व्याख्यान, घोष वाक्य आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात समुपदेशक संदेश थोरात यांनी एड्स एक जागतिक महामारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रेय रोकडे यांनी एड्स कारणे, उपाय, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील कांबळे यांनी एड्स समज-गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत शेवाळे होते.
या वेळी विद्यार्थी गटचर्चा, प्रश्न उत्तरे व मुक्त संवाद या माध्यमातून संवाद घडवून आणला. त्या नंतर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून वारूळवाडी व नारायणगाव परिसरातून एड्स जाणीव जागृती रॅली काढण्यात आली. अभियानाचा समारोप नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात झाला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शर्मिला गायकवाड, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे सेक्रेटरी नंदकुमार चिंचकर, खजिनदार नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते, अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक रमेश मेहत्रे, डॉ. अशोक माटे, डॉ. मिलिंद घोरपडे, डॉ. अभिजित काळे, डॉ. प्रशांत पाटील सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्रा. स्वप्नील कांबळे यांनी केले.