जुन्नरच्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षांची गोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरच्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षांची गोडी
जुन्नरच्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षांची गोडी

जुन्नरच्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षांची गोडी

sakal_logo
By

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. ११ : अतिवृष्टी, ढगाळ वातावरण या प्रतिकूल हवामानाचा सामना करत द्राक्ष बागा फुलवण्यात जुन्नर तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना यश आले. द्राक्ष मणी सध्या पाणी सुटण्याच्या अवस्थेत आहेत. काही अपवाद वगळता यावर्षी तालुक्यात सद्यःस्थितीत द्राक्ष बागांची स्थिती समाधानकारक आहे. पुढील तीन महिने निसर्गाने साथ दिल्यास यावर्षी तालुक्यात निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन निघेल, असा अंदाज द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.


या वर्षी पाऊस लांबल्याने सप्टेंबर महिन्यात बागांची अगाद छाटणी करता आली नाही. बहुतेक शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात छाटणी केल्याने या वर्षी काढणी हंगाम एक महिना लांबला आहे. बागांची सद्यःस्थिती पाहता या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान द्राक्ष काढणी हंगाम सुरू राहील. ऑक्टोबर छाटणीनंतर हवामान पोषक राहिले आहे. शेतकऱ्यांनी रात्रं-दिवस मेहनत करून मागील तीन महिने बागेचे उत्तम व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे बागा उत्तम दर्जाच्या द्राक्ष घडांनी बहरल्या आहेत. प्रत्येक वेलीवर २५ ते ३० घड लगडले आहेत. एकरी सुमारे चार लाख रुपये भांडवली खर्च झाला आहे. उच्च प्रतीची निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी शेतकरी वेलीवरील घडांची संख्या, मण्यांचा आकार, मण्यांची लांबी, साखरेचे प्रमाण, कीटकनाशक अंशमुक्त, रंग व कुरकुरीतपणा याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे जितेंद्र बिडवई, हरिभाऊ वायकर, द्राक्ष उत्पादक सचिन तोडकरी, रोहन पाटे, अमोल पाटे, गणेश मेहेत्रे, जितेंद्र भोर यांनी दिली.


जुन्नर तालुक्यातील द्राक्ष पिकाचा आढवा
- लागवडीखालील क्षेत्र : चार हजार एकर
- जाती : जम्बो, शरद सीडलेस, फ्लेम क्रिमसन, किंग बेरी, सुपर सोनाका, थॉमसन सीडलेस
- एकूण उत्पादन : सुमारे १५ ते २० हजार टन
- निर्यात : सुमारे १० हजार टन
- निर्यात केले जाणारे प्रमुख देश : चीन, कुवेत, बांगलादेश, दुबई, श्रीलंका
- वार्षिक एकूण आर्थिक उलाढाल : सुमारे १२५ कोटी रुपये.

निर्यातक्षम द्राक्षासाठी अटी
- मण्यांचा आकार : १७ ते २२ एम एम
- साखरेचे प्रमाण : १७ ते १९ ब्रिक्स मीटर
- कीटकनाशके अवशेष मुक्त

डीजे एक्सपोर्ट कंपनीमार्फत जुन्नर तालुक्यातून दरवर्षी सुमारे २५० कंटेनर (३२५० टन) निर्यात केली जातात. चीनमध्ये फेस्टिवल चालू असल्याने सध्या जंबो द्राक्षाला मागणी आहे. यावर्षी एक महिना द्राक्ष हंगाम लांबला आहे. निर्यातक्षम जंबो द्राक्षाचा खरेदीचा भाव प्रतिकिलो १३० ते १३५ रुपये आहे. सद्यःस्थितीत द्राक्ष उपलब्ध नाहीत. फेब्रुवारी महिन्यात द्राक्ष काढणी हंगाम सुरू होईल. पुढील तीन महिने पाऊस न झाल्यास या वर्षी एकूणच द्राक्ष हंगाम चांगला राहील.
- बिजू जोसेफ, व्यवस्थापक, डीजे एक्स्पोर्ट कंपनी

जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक जंबो जातीच्या काळ्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात राज्यात आघाडीवर आहेत. मागील तीन वर्षे गारपीट, अतिवृष्टी, अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करताना द्राक्ष उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. खते, औषधे, मजुरी, डिझेल, पेट्रोल आदींचा वाढलेला भांडवली खर्च व कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे निर्यातीत झालेलील्या घटीमुळे भांडवली खर्च अंगावर आला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या सात-बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादकांनी हार मानली नाही.
- अनिल मेहेर, अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (ता. जुन्नर)