
खोडदला उद्यापासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
नारायणगाव, ता.२६ : खोडद (ता. जुन्नर) येथील जिएमआरटी प्रकल्पाच्या वतीने जागतिक विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी २०२३ ते १ मार्च २०२३ दरम्यान दोन दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. चार गटात २ हजार १५० प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. दोन्ही दिवशी हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.
कोरोना काळात दोन वर्षे जीएमआरटीने फक्त ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ऑनलाइन प्रदर्शनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या वर्षी ऑनलाइन व खुले विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. २४ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ३६० शाळांमधील सुमारे ८५० प्रकल्प सहभागी झाले आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ऑटोमिक एनर्जी कमिशनचे सचिव सुनील गंजू यांच्या हस्ते होणार आहे. १ मार्च रोजी सांयकाळी ४ वाजता आधारक संशोधन संस्थेचे निर्देशक डॉ. प्रशांत ढाकेफलकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण होणार आहे.
जिएमआरटी दुर्बीण पाहण्याची दुर्मिळ संधी
प्रदर्शन कालावधीत जिएमआरटी दुर्बीण केंद्र व वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी यांनी दिली. टाटा मूलभूत संशोधन संस्थेने खोडद येथे उभारलेली जीएमआरटी ही एका विशिष्ट प्रकारातील जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वर्षातून दोन दिवस जिएमआरटी दुर्बीण केंद्र पाहण्याची दुर्मिळ संधी नागरिकांना मिळते.
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थांना विविध प्रकारचे उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दलची मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या भागातील विद्यालय, महाविद्यालय व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्राथमिक (५ वी ते ७ वी), माध्यमिक (८वि ते १० वी), उच्चमाध्यमिक (डिप्लोमा / डिग्री, बीएससी.) आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा चार गटांमध्ये प्रदर्शनातील प्रकल्प विभागणी केली आहे.
प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या (नोंदणीकृत) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
03402