नारायणगावात जालना, बीडच्या टोमॅटोचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगावात जालना, बीडच्या टोमॅटोचा डंका
नारायणगावात जालना, बीडच्या टोमॅटोचा डंका

नारायणगावात जालना, बीडच्या टोमॅटोचा डंका

sakal_logo
By

नारायणगाव, ता.२६ : येथील (ता. जुन्नर) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात जालना, बीड भागातील शेतकरी सुमारे साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून टोमॅटो क्रेट विक्रीसाठी घेऊन आले होते. उच्च प्रतीची चमक व दर्जेदार असलेले हे टोमॅटो बाजारात लक्षवेधी ठरले. आज येथील उपबजारात जुन्नर, आंबेगाव सह जालना, बीड, नगर, पारनेर, शिरूर भागातून साडेतीन हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली.

उपबाजारात प्रतवारी नुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) १०० रुपये ते ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. विक्रीसाठी जालना, बीड येथून आलेली उच्च प्रतीची चमक असलेली, लाल रंगाची टोमॅटो लक्ष वेधून घेत आहेत. या टोमॅटोला वाढीव भाव मिळत आहे.

उन्हाळी व पावसाळी आशा दोन हंगामात टोमॅटो उत्पादन घेत होते. टोमॅटो खरेदी विक्रीतून येथील उपबजारात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये प्रतिकूल हवामान, मजूर टंचाई,वाढलेला भांडवली खर्च, सतत टोमॅटो घेतल्यामुळे पांढरी माशी, लाल कोळी व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात झालेली घट, टोमॅटो उत्पादन घेणे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. यामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली आहे.

नारायणगाव ही टोमॅटोची राज्यातील मोठी बाजारपेठ आहे.जालना, बीड, नगर, पारनेर, शिरूर या भागातील बाजारपेठेच्या तुलनेत टोमॅटोला वाढीव भाव मिळत असल्याने शेतकरी ३५० किलोमीटरचा प्रवास करून टोमॅटो येथील उपबजारात विक्रीसाठी आणतात.
- योगेश घोलप, टोमॅटो व्यापारी

२५ गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. भांडवली खर्च ८० हजार रुपये झाला. टोमॅटोचे १२०० क्रेट उत्पादन निघाले.१०० रु.ते २००रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. खर्च वजा जाता मागील अडीच महिन्यात ऐशी हजार रुपयांचा नफा झाला.
- ओंकार डेरे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, पिंपरी पेंढार

नारायणगाव उपबजारात आज टोमॅटोचे २०० क्रेट विक्री साठी आणले होते. प्रति क्रेट ८० रुपये वाहतूक खर्च झाला. खर्च वजा जाता प्रति क्रेट २००रुपये शिल्लक राहिले.जालना बाजारपेठेच्या तुलनेत नारायणगाव उपबजारात टोमॅटोला दुप्पट भाव मिळत आहेत. शिवाय हमाली, दलाली, कर असा कोणताही खर्च नाही. विक्रीनंतर लगेच पैसे मिळतात.
- गजानन ऐसलरे, टोमॅटो उत्पादक शेतकरी जालना

नारायणगाव(ता.जुन्नर) : जालना येथून येथील उपबजारात विक्रीसाठी आलेली टोमॅटो.