शिस्तीमुळे जुन्नर बाजार समितीची प्रगती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिस्तीमुळे जुन्नर बाजार समितीची प्रगती
शिस्तीमुळे जुन्नर बाजार समितीची प्रगती

शिस्तीमुळे जुन्नर बाजार समितीची प्रगती

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १९ : ‘‘जुन्नर तालुक्यातील खरेदी विक्री संघ, बाजार समिती, सहकारी सोसायटी या सहकारी संस्थांचा कारभार चांगला आहे. सहकारात राजकारण न करता सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊन जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे हे काम करत आहेत. सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव काळे यांच्याप्रमाणेच सहकार क्षेत्र त्यांनी जपले आहे. त्यांची शिस्त, उत्कृष्ट नियोजन व योग्य धोरणामुळेच जुन्नर बाजार समितीची प्रगती झाली असून, वार्षिक उलाढाल तीनशे कोटी वरून बाराशे कोटी रुपयांची झाली आहे,’’ असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने शनिवारी (ता. १९) नारायणगाव (ता. जुन्नर) येथे सहकार मेळावा आयोजित केला होता. या वेळी पीक कर्ज वसुलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तालुक्यातील सहकारी सोसायटीचे पदाधिकारी व जुन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दुर्गाडे होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार दिलीप मोहिते व अतुल बेनके, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संजय काळे, पूजा बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शिवसेना तालुकाप्रमुख माउली खंडागळे, अशोक घोलप, जुन्नर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मंगेश खिलारी, विनायक तांबे, गुलाबराव नेहरकर, निवृत्ती काळे, रघुनाथ लेंडे, किशोर दांगट, गुलाब पारखे, बाजीराव ढोले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे, छगन इंगळे, बाळासाहेब मुरादे, सुभाष कवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन धनेश संचेती, सुभाष कवडे, शरद घोंगडे, रूपेश कवडे,यांनी केले.
प्रा. दुर्गाडे म्हणाले, ‘‘सहकारी संस्था सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा आधार आहेत. अडचणीत असणाऱ्या सहकारी सोसायट्यांना उर्जित अवस्था प्राप्त होण्यासाठी जिल्हा बँकेने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संस्थांना दहा वर्षासाठी वीस लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी दिले जाते. सहकारी संस्थांनी केवळ कर्ज देणे व वसुली करणे, या व्यतिरिक्तही इतर व्यवसाय सुरू करून संस्था आर्थिक सक्षम कराव्यात.’’
आमदार मोहिते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी सर्वसामान्य जनतेला अधांतरी ठेवण्याचे काम केले असून, राज्यातील सहकार अडचणीत आणण्याचे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा बळिराजा कर्जबाजारी झाला आहे. घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देणे आवश्यक आहे. जगाचा पोशिंदा बळिराजा जिवंत ठेवायचा असेल; तर शेतीला उद्योग समजून शासनाने मदत केली पाहिजे.’’

‘महाविकास आघाडी म्हणून लढू’
आमदार बेनके म्हणाले, ‘‘राज्यातील राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. राज्यात महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. मतभेद बाजूला ठेवून तालुक्यातील बाजार समितीसह अन्य निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवू. महाविकास आघाडीचे प्रमुख जो उमेदवार देतील, त्याला पाठिंबा द्या.’’

गैरव्यवहार करणाऱ्यांना मी कधीही पाठीशी घालत नाही. सहकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेच्या वतीने आवश्यक ती मदत करत आहे. तालुक्यातील सोसायट्यांनी जिल्हा बँकेच्या मार्फत तीनशे कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज देण्याची माझी भूमिका राहिली आहे.’’
- संजय काळे, संचालक, जिल्हा बॅंक