जुन्नरमध्ये पंचनामे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमध्ये पंचनामे सुरू
जुन्नरमध्ये पंचनामे सुरू

जुन्नरमध्ये पंचनामे सुरू

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १९ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, पारगावतर्फे आळे, झापवाडी, मंगरूळ, साकोरी, रानमळा, आर्वी, गुंजाळवाडी या गावात शनिवारी (ता. १८) दुपारी गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे पंचनामे रविवारपासून सुरू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी दुपारी गारांचा वर्षाव झाला. गारांच्या तडाख्यामुळे द्राक्ष, कांदा, कलिंगड, गहू या प्रमुख पिकांसह आंबा व इतर उभ्या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मागील पाच दिवस सातत्याने मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने निर्यातक्षम परिपक्व द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्ष मातीमोल झाली आहेत. रविवारी तहसीलदार सबनीस, गटविकास अधिकारी रमेश चंद्र माळी यांनी पथकासह पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील गावकामगार तलाठी यांना नुकसानीची माहिती कळवावी, असे आवाहन तहसीलदार सबनीस यांनी केले.

आर्थिक मदतीची मागणी
गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने व आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.